हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात सध्या गाईच्या दुधाला चांगला दर मिळावा म्हणून आंदोलन छेडलं जात आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कुणी म्हंटलं की, गाढविणीचं दूध 10 हजार रुपये लिटरने दिले जात आहे. तर तुमच्या भुवया उंचावल्याशिवावाय राहणार नाहीत… पण हे खरंय .. उस्मानाबादेतल्या उमरगा इथे 10 व्यावसायिक चक्क गाढविणीचे दूध घरोघरी जाऊन विकत आहेत.
हातात एक भोंगा घेऊन हे व्यावसायिक घरोघरी जाऊन गाढविणीच्या दुधाची विक्री करीत आहेत. विशेषतः लहान मुलांसाठी हे दूध चांगले असल्याचे या विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. सध्या विविध रोगांनी डोकं वर काढलं आहे. अशातच गाढविणीचे दूध हे आरोग्यासाठी उत्तम असल्याचे या विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर या दुधामुळे लहान मुलांच्यात प्रतिकार शक्ती वाढते. तसेच सर्दी ,खोकला, कफ न्यूमोनिया यासारखे आजार होत नसल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या उमरग्यात गाढविणीच्या दूध विक्रेत्यांचा भोंगा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
नांदेडहुन आलेल्या मनोज मासेवाड या व्यावसायिकाने याबाबत बोलताना सांगितले की, पूर्वीच्या काळी लहान मुलांना सर्दी,खोकला , कफ यासारखे आजार होऊच नयेत याकरिता गाढविणीचे दूध दिले जायचे. या दुधाला एका लिटर साठी दहा हजार रुपयांचा दर मिळत असल्याचे मासेवाड यांनी सांगितले.