हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी हंगामानंतर आता शेतकऱ्यांना वेध लागले आहेत ते आगामी खरीप हंगामाचे. मागील वर्षी मिळालेला सोयाबीनचा दर पाहता यंदाच्या वर्षी देखील शेतकरी सोयाबीनला पसंती देतील. मात्र यंदाच्या खरीप हंगामासाठी खात्रीलायक बियाणे नसल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्यांवर भर द्यावा असे सांगितले असून बाजारपेठेतील बियाणे प्रमाणित असतीलच असे नाही. त्यामुळे अशा बियाण्याच्या वापरामुळे उत्पादनात घट येण्याचाही अंदाज आहे. म्हणूनच आतापासूनच कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. त्याबरॊबरच उन्हाळी सोयाबीन घेतलेल्या शेतकऱ्यांनीही बियाणे प्रमाणित करून घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
उन्हाळी सोयाबीनला अवकाळीचा फटका
उन्हाळी सोयाबीनचा पेरा चांगला झाला असला तरी सगळीकडचे पीक बहरत आहे असे नाही. कारण राज्यात बऱ्याच ठिकाणी मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण राहिले होते त्यामुळे उन्हाळी सोयाबीन पिकावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळेही उत्पादनात घट होण्याचाही अंदाज आहे. दरम्यान आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरावे असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
अशी घ्या बियाणाची काळजी
–बियाणांची योग्य काळजी घेतली तरच ते प्रमाणित राहणार आहे.
— शेतकऱ्यांनी बियाणाची साठवणूक करताना पोत्यांची थप्पी ही सातपेक्षा अधिक असू नये.
–साठवणूक ही कोरड्या जागेत करावी लागणार आहे.
— साठवणूक करण्यापूर्वी जमिनीवर लाकडी फळ्या किंवा पुट्टे अंथरुन त्यावर बियाणे साठवावे लागणार आहे.
–शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणांची तीन वेळा उगवण क्षमता पाहूनच पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.