शेतकरी प्रतीक्षेत, मान्सूनचे आगमन लांबले..! ‘या’ दिवशी धडकणार केरळात

farmer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सूनचे केरळमधील आगमन अखेर लांबले आहे. त्यामुळे मान्सूनची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. यंदा मान्सून 31 मे रोजी केरळात पोहोचणार होता मात्र वाऱ्याची गती मंदावल्याने तो आता येत्या गुरुवारी पोहोचेल. असा नवा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी जाहीर केला. दरम्यान राज्यात मान्सून पूर्व पावसाचा जोर वाढणार आहे. सोमवार ते गुरुवार पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आह. यावर्षी मान्सूनच्या हालचाली फार लवकर सुरू झाल्याने तो सोमवार पर्यंत केरळात येईल असा अंदाज काही दिवसांपूर्वी हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला होता.

‘यास’ चक्रीवादळामुळेही त्याला गती मिळाली होती. मात्र हे चक्रीवादळ शमताच मान्सूनला गती मिळण्याऐवजी मंद झाली आहे. आता मान्सून गुरुवारी केरळात दाखल होईल असा नवा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी व्यक्त केला आहे. सध्या मान्सून मालदीव बेटांवर रेंगाळला आहे तो सोमवारी केरळच्या दिशेने रवाना होईल व गुरुवारी तिथं पोहोचेल असा अंदाज आहे.

राज्यात चार दिवस मुसळधार

मान्सूनचे केरळातील आगमन लांबल्याने तो तळ कोकणातही तो 10 जून नंतरच येईल. मात्र हिमालयात पश्‍चिमी चक्रावात निर्माण झाल्याने उत्तर प्रदेश ते विदर्भ तर मराठवाडा ते दक्षिण तमिळनाडू या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे देशभर मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे

स्कायमेट या एजन्सीने मात्र मान्सून दोन दिवसांपूर्वीच केरळ मध्ये पोहोचला असल्याची घोषणा केली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून सामान्य गती पेक्षा अधिक वेगाने पुढे सरकत असल्याचे म्हटले आहे.