हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात अनेक शेतकरी हे शेळीपालन (Goat Farming) करतात. शेळीपालन व्यवस्थापनात सर्वांत जास्त काळजी ही गोठ्यात असणारी आर्द्रता कमी करण्यासाठी घ्यावी लागते. शेळ्यांना आर्द्रता सहन होत नाही, त्यामुळे त्यांना श्वसनसंस्थेचे रोग होण्याची दाट शक्यता असते. पावसाळ्यात आद्रतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यात शेळ्यांच्या व्यवस्थापनात (Goat Farming), त्यानुसार बदल करणे गरजेचे आहे. ज्यामुळे शेळीपालनातील आर्थिक नुकसान कमी करण्यास मदत होते.
जंतुनाशक औषधे द्यावीत (Goat Farming In Rainy Season)
परिणामी शेतकऱ्यांना पावसाळी शेळ्यांच्या व्यवस्थापनाबाबत (Goat Farming) माहिती असणे गरजेचे असते. यासाठी शेळीपालन व्यवसायात असणारी जागरूकता महत्त्वाची असते. शेळीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण वाढणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. कळपातील सर्व शेळ्यांना जंतुनाशक औषधे द्यावीत. त्यामुळे कळप जंतमुक्त राहू शकतात.
अशावेळी शेळ्यांच्या अंगावर गोचीड होतात. त्यामुळे शेळ्यांना रोग होतात गोचीड शेळ्यांच्या शरीरातील रक्त शोषतात. त्यामुळे शेळ्या अशक्त होतात. अंगावर खाज सुटते, त्यामुळे शेळ्या बैचेन होतात, खाणे बंद करतात, हालचाल मंदावते यावर उपाय म्हणून शेळ्यांच्या अंगावर गोचीड प्रतिबंधक औषध लावावे किंवा गोठा धुऊन घ्यावा. ज्यामुळे शेळ्यांना होणाऱ्या आजारांपासून वाचवण्यास मदत होणार आहे.
आर्द्रता कमी ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
शेळ्यांना आर्द्रता अजिबात सहन होत नाही, त्या उष्णता सहन करू शकतात. गोठ्यातील आद्रता कमी ठेवण्यासाठी गोठ्यात रात्रीच्या वेळी शेगडी लावावी अथवा ६० वॉटचा विजेचा बल्ब रात्रभर लावून ठेवावा. गोठ्यातील मलमूत्र रोजच्या रोज साफ करून गोठा कोरडा ठेवावा गोठ्यातील जमीन जर ओली असेल तर शेळ्यांच्या पायाच्या खुरामध्ये ओलसर पणा राहून पायाला फोड येतात, यामुळे शेळ्या लंगडतात, ताप येतो, चारा कमी खाते अशक्त होतात.
पावसाळ्याच्या दिवसात शेळ्यांना बाहेर सोडू नये. पावसात जास्त वेळ शेळी भिजली की न्यूमोनियासारखा आजार होतो. यामुळे शेळी शिंकते, नाकातून चिकट पांढरा पिवळसर द्रव वाहतो, ताप येतो, धाप लागते. कोवळ्या चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी असतात, जास्त प्रमाणात हा चारा खाल्यामुळे शेळ्यांना अपचन होते. पोटफुगी, हगवणीसारखे आजार होतात. पोटफुगी होऊ नये यासाठी गोडे तेल आणि खाण्याचा सोडा पाजला तर पोटफुगी कमी होते.