पहाटेच्या अंधारात उसाने भरलेली ट्रॉली घरावर कोसळली ; ५५ वर्षीय महिला व बालिकेचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :परभणी प्रतिनिधी

परभणी जिल्हातील पाथरी तालुक्यात बाभळगाव येथे ऊसाने भरलेली ट्रॉली रस्त्या शेजारी असणाऱ्या घरावर कोसळल्यानंतर पहाटे साखरझोपेत असणाऱ्या आजी आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार 30 नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

तालुक्यातील बाभळगाव येथून माजलगाव येथील साखर कारखाण्याला ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर एका रहिवासी घरात शेजारून जात असताना ट्रॉलीत असणाऱ्या उसासह ट्रॉली घरावर कोसळल्यानंतर या वेळी घरात साखरझोपेत असणाऱ्या पलंगावर झोपलेल्या पारुबाई रंगनाथ पवार (55) आणि त्यांची नात शिवानी संजय जाधव ( 8 )  या दोघी ऊसाच्या ढिगा खाली गाढल्या गेल्या. अचानक अंगावर कोसळलेल्या उसाच्या मोळ्यांने पहाटेच्या गाढ झोपेत असलेल्या आजी नातीला काहीच हालचाल करता आली नाही.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेऊन घरावर पडलेल्या उसाच्या मोळ्या बाजूला काढल्या. मात्र, पारुबाई पवार यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांची नात शिवानी जाधव गंभीर जखमी आढळून आली. जखमी शिवानीला तातडीने परभणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती कळत आहे . या घटनेत घरात पलंगाच्या बाजूला झोपलेली पुष्पा पवार ही महिला सुदैवाने बचावली आहे.
या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .