कांदा लागवड तंत्रज्ञान : सुधारित जाती कोणत्या? लागवडीची योग्य वेळ अन खत, पाणी व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या सर्व माहिती

कांदा लागवड तंत्रज्ञान
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कांदा लागवड तंत्रज्ञान : कांदा पीक हे महाराष्ट्रातील अनेक भागात प्रमुख पीक म्हणून घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र ते मराठवाड्यात कांद्याची लागवड करणारे अनेक शेतकरी आहेत. कांद्याला कधी खूप चांगला भाव मिळतो तर कधी कधी शेतकऱ्याचे खर्च झालेले पैसेदेखील कांद्यातून मिळत नाहीत. परंतु कांदा लागवड तंत्रज्ञान समजून घेऊन तुम्ही जर कांदा शेती केली तर तुम्हाला हमखास चांगले उत्पादन मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला कांदा लागवड तंत्रज्ञानावर सविस्तर माहिती देणार आहोत.

कांदा लागवडीसाठी जमीन मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी निवडावी.

लागवडीची वेळ: नोव्हेंबर – डिसेंबर
अ) लागवडीची पध्दत: गादी वाफ्यावर तयार केलेली रोपे सपाट वाफ्यात स्थलांतर करावीत.
ब) हेक्टरी बियाणे ८ ते १० किलो : पूर्वमशागत : शेतास आडवी उभी नांगरणी दिल्यावर ढेकळे फोडून वखरणी करावी. नंतर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी – ४०-५० गाड्या टाकावे. पुन्हा वखराची एक पाळी द्यावी म्हणजे शेणखत पूर्णपणे जमिनीत मिसळले जाईल.

सुधारित जाती :

खरीप व उशिरा खरीप हंगामाकरीता :
गडद लाल जाती: एन-५३, बसवंत ७८०, अँग्री फाऊन्ड डार्क रेड, अर्का कल्याण, भीमा ‘सुपर, भीमा रेड, फुले समर्थ.
विदर्भासाठी भीमाराज उशीरा खरीपाच्या लागवडीसाठी शिफारस केली आहे.
रबी हंगामाकरीता : फिक्कट लाल जाती अॅग्री फाऊन्ड लाईट रेड, भीमा शक्ती, भीमा किरण, एन-२-४-१, पुसा रेड, अर्का निकेतन.
पांढऱ्या जाती: अकोला सफेद, फुले सफेद, भीमा श्वेता, पुसा व्हाईट फ्लॅट, पुसा व्हाईट राऊंड,

लागवड :

सपाट वाफ्यामध्ये ६-८ आठवड्याचे रोप १० x १० सें.मी अंतरावर लागवड करावी.

खत व्यवस्थापन :

हेक्टरी १०० किलो नत्र ५० किलो, स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. यापैकी अर्धा नत्र व पूर्ण स्फुरद व पालाश लागवडीचे वेळी व राहिलेला अर्धा नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. विदर्भातील उशिराच्या खरीपाच्या लागवडीसाठी १५०:५०:५० किलो नत्रः स्फुरदः पालाश व ३० किलो गंधकाची शिफारस केली आहे.

पाणी व्यवस्थापन :

दर ८ ते १२ दिवसानी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पिकाच्या गरजेनुसार, हंगामानुसार जमिनीच्या मगदुराप्रमाणे हा कालावधी कमी जास्त करावा.

आंतरमशागत: पीक स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी ३ ते ४ निंदण द्यावेत किंवा रोपे लागवडीपूर्वी ट्रायफ्ल्युरालीन १ किलो
(क्रियाशील घटक) प्रति हेक्टरी फवारून ४५ दिवसांनी एक निंदण द्यावे.

पिकाचा कालावधी: कांदा पीक रोपे लागवडीपासून साधारणपणे १२० दिवसात तयार होते.

काढणी : पिकाचे ५० टक्केपेक्षा जास्त पाने पिवळी पडून सुकू लागल्यावर पिकाची काढणी करावी. काढणीपूर्वी ८-१५ दिवस अगोदर ओलीत बंद करावे. त्यामुळे कांदा काढणे सोयीचे होईल. काढणी नंतर कांदा पातीसह कमीत कमी ७-८ दिवस शेतात सावलीत सुकू द्यावा.

उत्पादन: कांदा पिकापासून हेक्टरी २०० २५० क्विंटल उत्पन्न मिळू शकते.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.