Onion Export Ban : गुजरातमध्येही शेतकरी आक्रमक; कांदा निर्यातबंदी हटवण्याची मागणी!

Onion Export Ban Gujarat Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा निर्यातबंदीमुळे (Onion Export Ban) शेतकरी आणि व्यापारी दोघेही मेटाकुटीला आले आहे. अशातच आता महाराष्ट्रासोबतच गुजरातमधून देखील कांद्यावरील निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी केली जात आहे. गुजरातमधील भावनगर या कांद्याच्या प्रमुख बाजार समितीच्या अध्यक्षांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहीत निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Export Ban) होणाऱ्या नुकसानीचे माहिती दिली आहे.

एपीएमसी अध्यक्षांचे गोयल यांना पत्र (Onion Export Ban Gujarat Farmers)

महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. या भागातील शेतकरी देखील सध्या आक्रमक पवित्रा घेत, भावनगर बाजार समितीतील लिलाव बंद पाडत आहेत. त्यामुळे भावनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष घनश्याम भाई पटेल यांनी पत्राद्वारे गोयल यांना कांदा निर्यातबंदी मागे घेण्याची विनंती केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “निर्यातबंदीनंतर कांद्याचे दर जवळपास २५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. अशातच देशातील अनेक भागांमध्ये त्या-त्या भागातील कांद्याची आवक होऊ लागली आहे. यामुळे सध्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा दाखल होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना कमी दर मिळत आहे. सरकारने आपल्या या निर्णयाचा विचार करत तो मागे घ्यावा” असेही त्यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांचे दुःख समजून घ्यावे

भावनगर बाजार समितीचे अध्यक्ष घनश्याम भाई पटेल यांनी म्हटले आहे की, सध्या भावनगर बाजार समितीमध्ये जवळपास 4,00,000 गोण्या कांद्याची आवक होत आहे. जी तुलनेने खूपच अधिक आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना दर घसरणीचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षीच्या हंगामातही शेतकऱ्यांनी बेभावात आपला कांदा विकला असून, यावर्षी शेतकऱ्यांना कांदा पिकातून घाटा सहन करावा लागतो आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून तात्काळ कांद्यावरील निर्यातबंदी मागे घ्यावी. शेतकरी आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी पिकांचे उत्पादन घेतात. लोकांना फुकट वाटण्यासाठी नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे दुःख समजून घ्यावे, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.