हॅलो कृषी ऑनलाईन : मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मात्र आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांसह कृषी विभागाने कंबर कसली आहे. आगामी खरिपासाठी बियाण्यांची उपलब्धता व्हावी यासाठी कृषी विभागाच्या निर्देशानुसार उन्हाळी सोयाबीनची लागवड करण्याचे आवाहन केले होते. नागपूर जिल्ह्यतही कृषी विभागाच्या साहाय्याने उन्हाळी हंगामात बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात तब्बल ३० हजार क्विंटल बियाणे राखून ठेवणे शक्य झाले आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी बियाण्यांची टंचाई भासणार नाही. असे कृषी विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना वापरता येणार घरचे बियाणे
शेतकऱ्यांना अनेकदा बोगस बियाणे उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय विकतच्या बियाण्यांकरिता जास्त पैसे मोजावे लागतात. मात्र कृषी विभागाच्या आवाहनानंतर केलेल्या बीजोत्पादन कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना घरच्या बियाण्यांच्या मोठा आधार होणार आहे. नागपूर जिल्ह्यात 1 हजार 52 हेक्टरावर बिजोत्पादनाचा कार्यक्रम राबवण्यात आला होता. या उन्हाळी सोयाबीनमधून 10 ते 12 हजार क्विंटल तर खरीपातून 25 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात बाजारपेठेतील बियाणावर अवलंबून राहण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येणार नसल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. कृषी विभागाने महाबीजच्या माध्यमातून केलेली जनजागृती यंदा कामी येणार आहे. शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरता येणार असून यातून उत्पादनही वाढेल असा विश्वास आहे. हेक्टरी 100 किलो बियाणे याप्रमाणे प्रमाण ठेऊन यंदा बिजोत्पादनाचा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.