हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस शेतीमध्ये कौशल्य आणि तंत्रज्ञान याचा शेतकऱ्यांनी वापर केल्यास श्रम , वेळ व पैशाची बचत होत उत्पादनात वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना ऊस शेती परवडणारी ठरणार आहे ,त्यासाठी शेतकऱ्यांनी कौशल्य आधारित शेतीकडे वळावे असे प्रतिपादन प्रकल्प आत्माचे संचालक संतोष आळसे यांनी पाथरगव्हाण येथे कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात केले .
परभणी जिल्ह्यातील पाथरगव्हाण येथे प्रकल्प आत्माच्या वतीने कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एक डोळा पद्धतीने ऊस रोपवाटिका करणे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा .आयोजन करण्यात आले होते .यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकल्प आत्माचे संचालक संतोष आळसे बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पाथरगव्हाणचे पोलीस पाटील अण्णासाहेब घांडगे , प्रमुख पाहुणे म्हणुन शेतकरी गजानन घुंबरे ,सर्वोदय शेतकरी उत्पादक कंपनी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर घांडगे ,कृषी पर्यवेक्षक बि.यू .शिंदे ,कृषी सहाय्यक गोपाल ढगे यांची उपस्थिती होती .
यावेळी पुढे बोलताना प्रकल्प संचालक आळसे म्हणाले की , शेती नफ्यात आणण्यासाठी पिकावरील उत्पादन खर्च शेतकऱ्यांना कमी करावा लागणार आहे .ऊस पिकातील दोन सरीं व झाडातील अंतर वाढल्याने उसाचे रोपे , बेणे व खत व्यवस्थापन यावरील खर्च कमी होणार असून त्यातून पाण्याची बचत होत ऊस वाढीसाठी आवश्यक घटक मुबलक प्रमाणात मिळत असल्याने उत्पादनातही वाढ होईल.खोडवा पिकामध्ये शून्य मशागतीचा अवलंब करत पाचट आच्छादन केल्याने तणाचा बंदोबस्त ,पाण्याची बचत व खुरपणी खर्च वाचल्याने मजुरांवरील खर्चही कमी होईल किंवा पर्यायाने तणनाशकाचा वापर कमी होईल असेही ते म्हणाले . पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर ,गटशेतीतून शेतकऱ्यांनी एकत्र येत अवजार बँकेची स्थापना करावी असे आवाहनही यावेळी त्यांनी केले .
दरम्यान शेतकरी गजानन घुंबरे यांनी बडचीप मशीन द्वारे एक डोळा पद्धत ऊस लागवड व रोपवाटिका निर्माण करणे या संदर्भात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .तर ज्ञानेश्वर घांडगे यांनी सर्वोदय शेतकरी उत्पादक कंपनी द्वारे शेतकऱ्यांसाठी करण्यात येत असलेल्या कामाची यावेळी माहिती दिली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल दलाल यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक नितीन जाधवर यांनी केले .कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पाथरगव्हाण येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती .