हेलो कृषी ऑनलाईन : राज्यात (Rains in Maharashtra) आज (दि. 14) मुख्यतः उघडीपीसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज कोकण विभागात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य भारतातील कमी दाब क्षेत्र उत्तरेकडे गेल्यानंतर उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पाऊस (Rains in Maharashtra) विश्रांती घेण्याची शक्यता आहे. सोमवारपासून (दि. 16) विदर्भात पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
या तारखेपासून महाराष्ट्रात मान्सूनच्या (Monsoon) माघारीची शक्यता
नैऋत्य मोसमी वाऱ्याचा (Monsoon) परतीचा प्रवास दि. 19 ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सर्वसाधारणपणे मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो, तर दि. 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशात पसरतो. मान्सूनचा (Monsoon) परतीचा प्रवास हा दि. 17 सप्टेंबर च्या आसपास सुरू होतो तर दि. 15 ऑक्टोबर पर्यंत माघारी फिरतो. वायव्य भारताच्या काही भागामधून मोसमी वारे (Monsoon) परत फिरण्यासाठी पुढील आठवड्यामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण होईल असे हवामान विभागाच्या वतीने सांगितले आहे.
महाराष्ट्रातून 27 सप्टेंबरपासून मान्सूनचा (Monsoon) परतीचा प्रवास सुरू होईल. त्यानंतर दि. 5 ते 7 ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यातून माघार घेण्याची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेचे माजी विभागप्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.