हॅलो कृषी ऑनलाईन : रशिया आणि युक्रेन मधून सर्व जगाला गहू, मका आणि सूर्यफूल तेलाचा मोठा पुरवठा होतो. युद्धामुळे आधीच शेतमालाचा अनेक वस्तूंचे दर वाढलेत युद्ध आणखी काही दिवस चालल्यास जगात अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात. याचा फटका इतर देशांसहित भारतालाही बसण्याची शक्यता आहे.
धान्यपुरवठा विस्कळीत होणार
रशिया आणि युक्रेनचा गहू आणि मक्यासह अन्नधान्य पुरवठ्यात मोठा वाटा आहे. अमेरिका कृषी विभागाच्या मते २०२०-२१ मध्ये या दोन्ही देशांनी 560 लाख टन गहू निर्यात केली. जागतिक निर्यातीत या देशांचा वाटा 27.6 टक्के होता. तर गहू निर्यातीत 15.4 टक्के हिस्सा आहे. रशिया आणि युक्रेन मधून 279 लाख टन मक्याची निर्यात झाली होती. त्यामुळे या देशातून धान्य पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे परिणामी अन्नधान्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी एक बाब म्हणजे अमेरिकेसह पूर्वेकडच्या देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र यामुळे कच्च्या मालासाठी रशियावर अवलंबून असलेल्या उद्योगांना मोठा फटका बसू शकतो. कोरोनातून आताकुठे अर्थव्यवस्था सावरत असताना हा मोठा धक्का असेल. अनेक देशांना आधीच महागाईच्या झळा बसत आहेत या देशांमध्ये आणखी महागाई वाढू शकते. युरोपातील अनेक देश यासाठी रशियावर अवलंबून आहेत. त्या देशांना पाईपलाईन द्वारे गॅसचा पुरवठा होतो. मात्र निर्बंध वाढल्यास या देशांना गॅस पुरवठा अशक्य होईल. तसेच रशियातून कच्चे तेल निर्यातही प्रभावित झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे. परिणामी कृषी आधारित उद्योगांचा ही उत्पादन खर्च वाढतो आहे.
तर तेलाचे दर गगनाला भिडतील
जागतिक बाजारात एकटा युक्रेन निम्मे सूर्यफूल तेल पुरवतो. युद्धामुळे तेथील उत्पादन आणि प्रक्रिया ठप्प होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास सूर्यफूल तेलाचे दर गगनाला भिडतील याचा सर्वाधिक फटका भारताला बसेल. भारताकडे आता आयातीसाठी पर्यायही नसतील त्यामुळे ग्राहकांना दरवाढीची झळ बसू शकते. भारतात 80 टक्के सूर्यफूल तेल युक्रेन मधून घेतले जाते. देशाच्या तेल बास्केटमध्ये सूर्यफुलाचा वाटा 15 टक्के आहे. ही स्थिती दहा दिवसात निवळली तर जास्त फरक पडणार नाही. देशात पंचेचाळीस दिवस पुरेल एवढा साठा आहे . परंतु युद्ध आणखी पाच ते दहा दिवस चाललं तर कारखाने आधीच बंद आहेत आणि वेल्स ही उपलब्ध होणार नाहीत अशा परिस्थितीत देशात एप्रिल महिन्यात काही टंचाई जाणवू शकते.
भारतात या वस्तू महाग होतील
–भारताचा विचार करता खनिज इंधन आणि तेल, मोती, मौल्यवान खडे, खते, मशीन आणि न्यूक्लियर रिअॅक्टर ची रशियातून पन्नास टक्के इतकी आयात होते.
— या युद्धामुळे भारताने या वस्तू इतर देशातून आयात केल्यास किमतीत चार ते सहा टक्के वाढ होऊ शकते.
— यूक्रेन मधून सूर्यफुलाचा व शेतीमाल वनस्पतीतील मेटलर्जिक उत्पादने प्लास्टिक आणि पॉलीमर्स ची आयात होते. या वस्तूंचे दर वाढण्याचा अंदाज आहे.
— भारतीय रिझर्व बँकेच्या अहवालानुसार कच्च्या तेलाच्या दरात दहा डॉलरची वाढ झाल्यास महागाई 0.5 टक्क्याने वाढते. असे झाल्यास भाजीपाला फळे डाळी खाद्यतेल आदींचे भावही वाढतील.