हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्हयात लाळ्या खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो आहे. एव्हढेच नाही तर या रोगामुळे लहान मोठी अशी ३५ जनावरे दगावल्याची माहिती देखील मिळाली आहे. तसेच १०० जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला आहे.
याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की , सांगली जिल्ह्यातील आटपाडी, भिंगेवाडी या भागात रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. खबरदारी म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून पाच किमी अंतरावरील जनावरांचे लसीकरण केले जात आहे. शिवाय ज्या जनावरांना लागण झाली आहे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे लसीकरणाची मोहिम सुरु असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॅा. किरण पराग यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. दरम्यान पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण सुरु करण्यात आले होते मात्र कोरोनाच्या प्रदूरभावामुळे त्यामध्ये खंड पडला होता.
रोगाची लक्षणे
1) सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागांत लाळ्या खुरकुताच्या साथी येतात. हा रोग खूर विभागलेल्या जनावरांना होतो. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व चारा खाल्ल्याने होतो.
२) रोगाची लक्षणे म्हणजे जनावरांचे खाणे- पिणे बंद होते. जनावरास ताप येतो. दुधाळ जनावरांत दूध उत्पादनात घट येते. जनावराच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात. जनावराच्या तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते.
३) पुढील पायांमध्ये खुरांतील बेचकीमध्ये फोड येतात. जनावरांना मागील पायांत फोड तयार झाल्यास अपंगत्व येते. पायाने अधू असलेले पीडित जनावर रोगग्रस्त पाय सारखे झटकत असते.
रोगावरील उपाय
1) या रोगाच्या साथीच्या काळात रोगी जनावरे कुरणात चरण्यासाठी जाऊ देऊ नयेत. रोगाचा प्रसार लाळेतून होत असल्याने आजारी जनावरांनी खाल्लेला चारा इतर जनावरांना खाऊ देऊ नये.
2) आजारी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत व त्यांच्यावर औषधोपचार करावा.
3) आजारी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता वेगळ्या ठिकाणी पाणी पाजावे. रोगी जनावरांची बांधण्याची जागा रोज किमान एकदा जंतुनाशकाने धुवावी.
4) दूध काढण्याची भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावी.
5) लाळ्या खुरकूत रोगावर लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. सर्व जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यतो होत नाही. या रोगाची लस सप्टेंबर आणि मार्च महिन्यात जनावरांना द्यावी.