हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या सुरुवातीला राज्यातल्या अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरण्या केल्या. सोयाबीनचे पीक देखील चांगले आले. मात्र आता पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसाच्या ओढीने सोयाबीनचे उत्पन्न घटण्याची चिन्हे आहेत. वाशीम जिल्ह्याचा विचार करता वारला महसूल मंडळातील वाई, वारला, शिरपुटी, कृष्णासह 18 गावात पावसा अभावी बळीराजा संकटात आलाय. या गावांमधील खरिपाच्या सोयाबीनचं पावसा अभावी 90 टक्के उत्पादन घटणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यात यंदा सुरुवातीला समाधानकारक पाऊस पडला. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेलं सोयाबीनचं उत्पान पावसाने उघडीक दिल्यानं संकटात आलं आहे. या 18 गावांमध्ये ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत सोयाबीन पीकाला पावसानं खंड दिल्यानं झटका बसलाय. त्यामुळे पिकाचं एकरी उत्पादन घटणार आहे. केलेली मेहनत आणि खर्च वाया जाणार असल्यानं शेतकरी चिंतेत आलाय. यानंतर आर्थिक संकट ओढविण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
केंद्र सरकारच्या सोयाबीन आयातीने दरात अडीच ते तीन हजाराची घसरण
दरम्यान, दुसरीकडे केंद्र शासनाने सोयाबीनची आयात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात सोयाबीनचे दर सतत कोसळत आहेत. अवघ्या आठवडाभरात सोयाबीनच्या दरात अडीच ते तीन हजार रुपयांची घसरण झाली. मागणी घटल्याने आता सोयाबीन खरेदी करून ठेवलेले व्यापारीही अडचणीत सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.