हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील एकूण ५३४ कारखान्यांपैकी (Sugar Production) तमिळनाडूतील तीन कारखान्यांचा अपवाद वगळता, २०२३-२४ च्या ऊस गाळप हंगामाची ३१ मेअखेर सांगता झाली आहे. त्यानुसार यंदा देशात एकूण ३१३७.८० लाख टन उसापासून ३१६.७० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. उसाचे गाळप गतवर्षीच्या तुलनेत १७९ लाख टनांनी कमी झाले आहे. तर साखरेचे उत्पादनही (Sugar Production) गेल्या वर्षाच्या तुलनेत १० लाख टनांनी घटले आहे.
महाराष्ट्रात 110.20 लाख टन उत्पादन (Sugar Production In India)
देशात यंदा महाराष्ट्राने साखर उत्पादन पहिला क्रमांक पटकावला असून, राज्यात ११०.२० लाख टन उत्पादन झाले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशने १०३.६५ लाख साखरेचे उत्पादन घेतले आहे. तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांतील विशेष गाळप हंगामदेखील सप्टेंबरपर्यंत चालणार असून, त्यातून तयार होणारे अपेक्षित साखर उत्पादन लक्षात घेऊन यंदाच्या हंगामअखेर देशपातळीवर एकूण ३२१.२५ लाख टन इतके निव्वळ साखर उत्पादनाची अपेक्षा आहे. तर २१ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविली जाणार आहे.
साखर उताऱ्यात वाढ
यंदा देशात एकूण ३१३७.८० लाख टन उसाचे गाळप झाले असून, ते गतवर्षीच्या तुलनेत १७९ लाख टनांनी कमी आहे. तसेच निव्वळ साखरेचे उत्पादनदेखील गतवर्षीपेक्षा ९.६५ लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र, यंदा देशपातळीवर सरासरी साखर उतारा १०.२० टक्के मिळाला असून, तो गेल्या वर्षी पेक्षा ०.२६ टक्क्याने जास्त आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या यंदा पर्जन्यमान सर्वदूर आणि समाधानकारक राहण्याचा अंदाज असून, त्याचा फायदा उसाच्या वाढीसाठी तसेच आडसाली आणि पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी फायदेशीर ठरणार आहे.
राज्यनिहाय साखर उत्पादन
दरम्यान, यंदा महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक ११०.२० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. त्यानंतर अनुक्रमे उत्तर प्रदेश १०३.६५ लाख टन, कर्नाटक ५२.६० लाख टन, गुजरात ९.२० लाख टन, तमिळनाडू ८.८५ लाख टन, बिहार ६.८५ लाख टन, पंजाब ६.२० लाख टन, हरीयाणा ५.९० लाख टन, मध्य प्रदेश ५.२० लाख टन, उत्तराखंड ३.१० लाख टन, आंध्र प्रदेश १.६० लाख टन तर उर्वरित राज्यांमध्ये १.५० लाख टन साखर उत्पादन नोंदवले गेले आहे.