कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात असलेला ऊस गाळपाशिवाय शिल्लक राहणार नाही ;सहकार मंत्र्यांचे आश्वासन !

suger factory
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यामध्ये गाळपाअभावी उभ्या असलेल्या अतिरिक्त उसाच्या संदर्भात विधान परिषद सदस्य आ . बाबाजानी दुर्राणी यांनी सोमवार 21 मार्च रोजी विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडली . यावर सरकारच्या वतीने उत्तर देताना जिल्ह्यातील सर्व उसाचे गाळप करण्यात येईल .गाळपाविना ऊस शिल्लक राहणार नाही असे आश्वासन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिले आहे .

सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात सोमवार 21 मार्च रोजी विधान परिषद सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी उर्फ बाबाजानी दुर्राणी यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अनुसार दिलेली लक्षवेधी सूचना क्र . ३ ९ ६ मांडली यावेळी आ .दुर्राणी यांनी परभणी जिल्हयात गाळपाअभावी मोठया प्रमाणावर ऊस उभा असुन , गोदावरी नदीवरील बंधारे तसेच जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने जिल्हयात मोठया प्रमाणावर ऊसाची लागवड झाली असल्याचे सांगत परभणी जिल्हयातील पाथरी , मानवत , सोनपेठ , परभणी , गंगाखेड , पुर्णा या तालुक्यात मोठया प्रमाणावर ऊसाची लागवड झाल्याचे निर्दशनास आणून दिले . यावेळी जिल्हयातील ६ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ३५ लक्ष मेट्रीक टन ऊस उत्पादन होत असुन परंतू केवळ २० लक्ष मेट्रीक टन ऊसाची गाळप क्षमता असल्याचे निर्दशनास आणून दिले .जिल्हयातील ३५ लक्ष मेट्रीक टन ऊसापैकी एकटया पाथरी तालुक्यातच सुमारे १२ लक्ष मेट्रीक टन ऊस उत्पादन झाले असुन जिल्हयातील बहुतांशी साखर कारखाने कार्यक्षेत्राबाहेरील व इतर जिल्हयातून ऊस आणून त्याचे गाळप करीत असल्याने परिणामी जिल्हयातील ऊस गाळपाअभावी उभाच आहे त्यात साखर कारखान्यांना असणारा गाळप परवाना १६० दिवसांचाच असल्याने कारखाने पूर्ण गाळपापूर्वीच बंद होतील अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत असल्याचेही सहकार मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे कार्यक्षेत्रातीलच ऊस गाळपाबाबत साखर कारखान्यांना बंधन करावे , संपूर्ण ऊस गाळपापर्यंत साखर कारखान्यांना गाळप परवाना वाढवून द्यावा , तसेच जिल्हयात संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बंद करू नये अशी मागणीही आ. दुर्राणी यांनी यावेळी केली .

यावेळी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ,परभणी जिल्ह्याचे ऊस पिकाखालील सरासरी क्षेत्र २५,०२७.५१ हेक्टर आहे . हंगाम २०२१-२२ करीता जिल्ह्यात ३६,६२ ९.९ २ हेक्टर क्षेत्रावर ऊस गाळपासाठी उपलब्ध होता . जिल्ह्यात श्री . रेणूका शुगर लि . देवनांद्रा ता . पाथरी , श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर एलएलपी अमडापूर , ता . परभणी , योगेश्वरी शुगर इंडस्ट्रिज लि . लिंबा , ता . पाथरी , गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी लि . माखणी ता . गंगाखेड , ट्वेंन्टीवन शुगर लि . उत्तमनगर , देवीनगर तांडा , सायखेडा , ता . सोनपेठ , आणि बळीराजा साखर कारखाना लि . कानडखेड , ता . पुर्णा हे सहा कारखाने चालू असून त्यांची गाळप क्षमता १८,२५० टन प्रतिदिन असली तरी सरासरी १२० टक्के गाळप क्षमतेने गाळप सुरू आहे असे सांगत आज अखेर या सहा कारखान्यांनी २७.६५ लाख टन गाळप पुर्ण केले असुन आणखी ९ .७८ लाख टन संभाव्य गाळप होईल . अशी माहीती दिली . प्रादेशिक सह संचालक ( साखर ) व साखर कारखान्यांचे शेती अधिकारी यांचे मार्फत दर आठवड्यास अतिरिक्त ऊस गाळपाचा आढावा घेऊन ऊस गाळपाचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगत परभणी जिल्ह्यातील रेणुका शुगर लिमिटेड पाथरी या कारखान्याकडे १.५० लाख टन अतिरिक्त ऊस आहे .त्या ऊसापैकी श्री लक्ष्मी नृसिंह शुगर एलएलपी , अमडापूर ३०,००० टन , गंगाखेड शुगर लि . , माखणी ६०,००० टन व ट्वेंटीवन शुगर लि . , सायखेडा ६०,००० टन ऊस गाळपासाठी नेणार आहेत अशी माहीती दिली.

तर साखर कारखान्यांना गाळप परवाना देताना १६० दिवसांचा दिलेला नसून संपूर्ण ऊसाचे गाळप होईपर्यंत दिलेला आहे त्यामुळे साखर कारखान्यांकडे नोंदणी केलेला तसेच नोंदणी न झालेला आणि गाळपास उपलब्ध असलेल्या ऊसाचे संपूर्ण गाळप करावे , तसेच साखर आयुक्त कार्यालयाच्या परवानगी शिवाय गाळप हंगाम बंद करू नये याबाबत सर्व कारखान्यांना दिनांक ८.२.२०२२ रोजीच्या परिपत्रकाव्दारे सूचना देण्यात आलेल्या आहेत अशी माहीती दिली . तसेच गाळप हंगाम बंद होण्याच्या १५ दिवस अगोदर गाळप हंगाम बंद होणार असल्याबाबत जाहीर निवेदन स्थानिक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात यावे , जेणेकरून ऊस उत्पादक शेतक – यांना कारखान्यांशी संपर्क करता येईल . तसेच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात असलेला ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही याची दक्षता घेणेबाबतही सूचना देण्यात आलेल्या आहेत . असे आश्वासन सहकारमंत्र्यांनी आमदार दुर्राणी यांनी मांडलेल्या लक्षवेधीला दिले आहे