हॅलो कृषी ऑनलाईन : अनेक शेतकरी शेतीबरोबरच पशुपालन ,कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. सध्या उन्हाळा सुरु झाला असून उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. विशेषतः ‘ हिट स्ट्रेस’ बाबत कोंबड्यांची काळजी घेणे गरजेचे असते. मुळातच कोंबड्यांच्या शरीराचे तापमान जास्त असते. त्यात गरम वातावरणामुळे त्यांच्यावर आणखी परिणाम होत असतो. शिवाय कोंबड्याना घामही येत नाही. त्यामुळे अशावेळी शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कोंबड्या पाण्याची भांडी, पाण्याचे पाईप यांना स्पर्श करतात. साधारणतः 35 अंश सेल्सिअस या तापमानापर्यंत कोंबड्यांना विशेष ताण येत नाही. परंतु, उन्हाळ्यात तापमान यापेक्षा खूप अधिक वाढते. अशा वेळी शेडमध्ये भरपूर खेळती हवा असणे आवश्यक असते. आजच्या लेखात आपण औषधी वनस्पतींच्या वापराद्वारे कशा पद्धतीने हिट स्ट्रेस वर उपाय करता येईल याची माहिती घेउया…
औषधी वनस्पतींचा वापर
— जीवनसत्त्वांचा पुरवठा होण्याकरिता आवळा व संत्री किंवा इतर लिंबूवर्गीय वनस्पतींचा वापर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणात करावा.
–आवळा: 10-20 ग्रॅम प्रति 100 कोंबड्या.
–संत्री/लिंबू: 30-40 ग्रॅम प्रति 100 कोंबड्या.
–लिंबू किंवा संत्र्याची सालदेखील उपयुक्त आहे. यांचादेखील वापर करावा.
–याचबरोबरीने अश्वगंधा, तुळस, मंजिष्ठा, शतावरी यांचा वापर करावा. अश्वगंधा: 4 ग्रॅम,मंजिष्ठा: 4 ग्रॅम,तुळस: 4 ग्रॅम,शतावरी: 5 ग्रॅम ह्या
वनस्पती एकत्र करून खाद्यातून 100 कोंबड्यांसाठी वापराव्यात.
–पाण्यातून वापर : वरील वनस्पतींमध्ये चारपट पाणी टाकून उकळाव्यात. पाणी अर्धे राहिल्यानंतर गाळून घेऊन हा अर्क 10 ते 15 मि.लि. प्रति 100 कोंबड्या या मात्रेत द्यावा.
हिट स्ट्रेस वरील औषधोपचार
–हिट स्ट्रेस वरील औषधोपचार करत असताना नंतर उपचार करण्याऐवजी जर कोंबड्यांच्या दैनंदिन खाद्यात जीवनसत्त्व ‘सी’ व ‘ई’ यांचा वापर करावा.
–व्हिटॅमिन ‘ई’चा वापर साधारणपणे 250 मि. ग्रॅ. प्रति किलो खाद्य व व्हिटॅमिन ‘सी’चा वापर 400 मि. ग्रॅम प्रति किलो खाद्य असा असावा.
–सोबतच इलेक्ट्रोलाइट्स व डेकस्ट्रोजचा वापर अत्यंत आवश्यक आहे.
–ताणामध्ये शरीर ऊर्जा एकदम न वाढता ती आवश्यक प्रमाणात सतत असणे आवश्यक आहे.
–अशावेळी प्रत्यक्ष कर्बोदकांऐवजी फॅटचा उपयोग खाद्यातून करावा.