वेळीच लक्ष द्या , टोमॅटोवरील ‘हे’ रोग करतील मोठे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : टोमॅटोचे पिक हे महाराष्ट्रातील महत्वाचे पिक असुन टोमॅटो पिकावर विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याकडे वेळीच लक्ष नाही दिले गेले तर पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.

१. लीफ कर्ल / पर्णगुच्छ (बोकड्या):

• हा एक विषाणूजन्य रोग आहे.
• या रोगामुळे पाने बारीक, वाकडी-तिकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी व शेंडे उभट दिसतात. पानांवर पिवळसर झाक दिसते. यामुळे झाडाची वाढ खुंटते.
• झाड खुजे राहून पर्णगुच्छ किंवा बोकडल्यासारखे दिसते.
• या रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला झाल्यास झाडावर फळे धरत नाही किंवा आकाराने लहान राहतात.
• या रोगाचा प्रादुर्भाव सुरवातीला झाल्यास फलधारणा होत नाही.

२. टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस:

• शेंड्याकडील नवीन पानांवर प्रथम लहान, तांबूस-काळसर ठिपके-चट्टे दिसतात.
• रोगाचे प्रमाण वाढून तीन-चार दिवसात कोवळी पाने करपून काळी पडतात व शेवटी झाड करपते व मरते.
• फळावर पिवळसर-लाल डाग तसेच गोलाकार एकात एक वलये दिसून येतात.
• फळे पूर्ण वाढ होण्यापूर्वीच पिकतात आणि त्यांना एकसारखा आकर्षक लाल रंग येत नाही.

३. टोमॅटो मोझॅक :

• हा रोग टोबॅको मोझॅक व्हायरस, कुकुंमबर मोझॅक व्हायरस, पोटॅटो मोझॅक व्हायरस या विषाणूमुळे होतो.
• या रोगामुळे पाने बारीक, फिक्कट हिरवी होऊन मलूल दिसतात. पानांवर हिरवट, पिवळसर डाग दिसतात. झाडाची वाढ खुंटते, फुले – फळे फार कमी प्रमाणात लागतात.
• फळाच्या आतील भागात काळसर तपकिरी भाग दिसून येतो. त्यामुळे टोमॅटो खराब होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
• रोगग्रस्त बियाण्यापासून तयार झालेल्या रोपांची लागवड केल्यास किंवा जमिनीतील रोगग्रस्त अवशेषामुळे रोपांच्या मुळांना लागण होऊन रोगाची सुरवात होते.
• हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे टोमॅटोची लागवड करताना तसेच आंतरमशागतीची कामे करते वेळी, स्पर्शाने आणि मावा व किडी मार्फत रोगाचा प्रसार अतिशय वेगाने होतो.
विषाणू रोगांचे व्यवस्थापन :
• विषाणू रोगाचा प्रसार पांढरी माशी, फुलकिडे, मावा व तुडतुडे या रस शोषण करणाऱ्या किडीद्वारे होतो. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगाची लागण रोपावाटीकेपासून पिकाच्या वाढी पर्यंत केव्हाही होते. प्रादुर्भाव झाल्यावर त्यावर नियंत्रण करणे अवघड जाते म्हणून या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपावाटीकेपासून काळजी घेणे फार गरजेचे आहे.
• रोगाची लक्षने दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून जमिनीत गाडून टाकावी किंवा जाळुन नष्ट करावीत.
• निरोगी बियाणांचा वापर करावा.
• शेतातील व शेताभोवतीची तणे नष्ट करावीत.
• पेरणीपूर्वी गादीवाफ्यावर फोरेट २५ ग्रॅम प्रति ३ x १ मीटर आकाराच्या गादीवाफ्यात मिसळावे.
• रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी झाल्यानंतर गादी वाफ्यावर ४० मेश नायलॉन नेट २ मीटर उंची पर्यत मच्छरदाणीसारखे टाकावे म्हणजे रोग प्रसार करणाऱ्या किडीपासून रोपांचे संरक्षण होईल.
• शेतात टोमॅटोची रोपे लावण्यापूर्वी इमिडाक्‍लोप्रीड (१७.८ % ईसी) ४ मि. ली. अधिक कार्बेन्डाझिम (५० % डब्ल्यू.पी.) १० प्रति १० लिटर पाण्यात घेऊन त्यात रोपे बुडवून नंतरच रोपांची शेतात लागवड करावी. लागवडी करीता चंदेरी (सिल्व्हर) मल्चिंग फिल्मचे आच्छादन वापरावे.
• सुरुवातीपासून रोग पसरविणाऱ्या किडीच्या बंदोबस्त केल्यास ह्या रोगांचा प्रसार होत नाही. त्यासाठी लागवडी नंतर १५ दिवसाच्या अंतराने सायॲण्ट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के ओ.डी. १२ मि. ली. किंवा डायमेथोएट ३० % ईसी २० मि. ली. किंवा थायोमिथॉक्झाम २५ % डब्ल्यू. जी. ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दर १० ते १५ दिवसाच्या अंतराने आवश्यकतेनुसार बदलून फवारण्या कराव्यात. निंबोळी अर्क ५ % ची फवारणी दोन फवारण्यांच्या मध्ये घ्यावी.
• पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्यांचा (प्रत्येकी १२ प्रति हेक्टर) उपयोगसुद्धा रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरतो. रस शोषक किडीना मुख्य पिकांवर येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी टोमॅटो पिकाच्या बाजुला मका किंवा ज्वारी पिकाच्या २ ते ३ ओळी लावाव्यात.