हॅलो कृषी ऑनलाईन: आजच्या जगात (Trichoderma Uses) सेंद्रिय शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे तसेच प्रगतशील देशांमध्ये सेंद्रिय शेतीमधील (Organic Farming) उत्पादनास चांगली मागणी आहे. पिकांवर रोगांचे नियंत्रण करण्याकरिता ट्रायकोडर्मा एक प्रभावी रोग नियंत्रक बुरशी आहे आणि तिचा वापर आपण जैविक शेतीमध्ये रोग नियंत्रणासाठी करू शकतो. अलिकडे रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ट्रायकोडर्माचा (Useful Fungi) वापर (Trichoderma Uses) होऊ लागला आहे.
ट्रायकोडर्माचा वापर जमिनीत वास्तवास असणार्या रोगकारक बुरशी (Harmful Fungi) जसे फ्युजॅरियम, रायझोक्टोनिया, स्क्लेरोशियम आणि पिथीयम मुळे उद्भवणारे रोग जसे मर, मुळकूज, खोडकुज तसेच काही बियाण्या द्वारे पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी (Disease Control) करता येतो.
ट्रायकोडर्मा कार्य कसे करते?
ट्रायकोडर्मा (Trichoderma Uses) अपायकारक बुरशीच्या धाग्यांमध्ये विळखा घालून आपले साम्राज्य पसरविते व नंतर या धाग्यांमध्ये छिद्र करून त्यातील पोषक अन्नद्रव्ये शोषून घेते त्यामुळे अपायकारक बुरशीचा विस्तार थांबतो.
ट्रायकोडर्मा अपायकारक बुरशीला मारक ठरणारे व्हिरीडी (Trichoderma viride) हे प्रतिजैवक सुद्धा तयार करते. अपायकारक बुरशीपेक्षा ट्रायकोडर्माची वाढ लवकर होते त्यामुळे ट्रायकोडर्मा ही बुरशी अन्नद्र्व्यांसाठी अपायकारक बुरशी बरोबर प्रतिस्पर्धा करून अपायकारक बुरशीच्या वाढीसाठी लागणारे कर्ब, नत्र, व्हिटॅमिन इत्यादी वापरून घेते त्यामुळे अपायकारक बुरशीची वाढ खुंटते.
ट्रायकोडर्माचा वापर (Trichoderma Uses)
हल्ली ट्रायकोडर्माच्या दोन प्रजाती मुख्यतेकरून वापरण्यात येतात – ट्रायकोडर्मा हरजीएनम आणि ट्रायकोडर्मा व्हिरीडी. या बुरशीचे संवर्धन 250 ग्रॅम आणि एक किलो पाकिटाच्या स्वरुपात बाजारात मिळते.
प्रामुख्याने ट्रायकोडर्माचा वापर बीज प्रक्रिया, रोपांची प्रक्रिया आणि मातीची प्रक्रिया करण्यासाठी केला जातो.
बीज प्रक्रिया (Trichoderma Seed Treatment): पेरणीच्या वेळी बियाण्यावर पाणी शिंपडून 1 किलो बियाणे 3 ग्रॅम ट्रायकोडर्मा सोबत व्यवस्थितपणे मिसळावे. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी.
रोपांची प्रक्रिया (Trichoderma Seedling Treatment): ज्या पिकांची लागवड रोपे तयार करून केली जाते त्या पिकांमध्ये लागवडीपूर्वी रोपांची मुळे ट्रायकोडर्मा भुकटी 500 ग्रॅम, 5 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात 5 मिनिटांसाठी बुडवून ठेवावीत व नंतर त्यांची लागवड करावी.
मातीची प्रक्रिया (Trichoderma Soil Treatment) – मातीची प्रक्रिया करताना 1 ते 1.5 किलो ट्रायकोडर्मा 25 ते 30 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून 1 हेक्टर शेतातील मातीत मिसळावे व शक्य असल्यास पाणी द्यावे.
फवारणी – पानावरील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणाकरिता कृषी विद्यापीठांनी विशिष्ट रोगांकरिता केलेल्या शिफारशींचा अवलंब करून फवारणी करावी.
ट्रायकोडर्माचा प्रभावी वापर होण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे
- पाण्याचा व्यवस्थित निचरा होणार्या जमिनीत ट्रायकोडर्माची वाढ जोमाने होते म्हणून जास्त ओलीत करू नये.
- जमिनीत सेंद्रिय पदार्थ असल्यास ट्रायकोडर्माची वाढ चांगली होते त्याकरिता शेतात चांगले कुजलेले शेणखत टाकावे.
- ट्रायकोडर्मा बुरशीचे पाकिट/ द्रावण जास्त काळ न ठेवता लवकरात लवकर वापरावे तसेच वापर होईपर्यंत त्यांना सूर्यप्रकाशापासून दूर थंड ठिकाणी ठेवावे.
- बियाण्यांच्या प्रक्रियेकरिता ट्रायकोडर्मा (Trichoderma Uses) सोबत रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू इत्यादी जैविक खतांचा वापर करता येतो.