पुढील चार दिवस राज्यात कशी असेल पावसाची स्थिती ? जाणून घ्या

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन आठवड्यात मान्सूनने राज्यात धुमाकूळ घातला आहे. पावसाने आता काहीशी उसंत घेतली असली तरी तो पुन्हा जोरदार कमबॅक करणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं (IMD) दिला आहे. गुरुवारपासून सोमवारपर्यंतचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून रविवारपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही जिल्ह्यांमध्ये संततधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अधिक पाऊस

रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात पुढचे तीन दिवस मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः समुद्रकिनारच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आदेश यापूर्वीच प्रशासनानं दिले आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

पुढच्या आठवड्यात उघडीप

सोमवारसाठी मात्र कुठलाही अलर्ट नसल्याचं सध्या सांगण्यात आलं आहे. हवामानाच्या सध्याच्या स्थितीनुसार पुढील आठवड्यात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता असल्याचं दिसत असलं, तरी परिस्थिती प्रत्येक क्षणी बदलत असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या तरी महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज असला तरी अनेकदा अचानक ढगांची दाटी होऊन जोरदार पाऊस कोसळत असल्याचे अनुभव यापूर्वीदेखील आले आहेत. सध्या मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा काही भाग वगळता इतरत्र सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.