हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील किमान आणि कमाल तापमानात विक्रमी वाढ झाल्यानंतर, राज्यात आता पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आज पुण्यासह 18 जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काल सायंकाळी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.
शेतीपिकांचे नुकसान
पपई, केळी, गहू, हरभरा अशा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळपास 11 गावातील अकराशेहून अधिक शेतकऱ्यांचं सातशे हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील आणखी तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज हवामान खात्यानं नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
याठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीटही होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय आज पुण्यासह पालघर, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.