हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण, पाऊस ,वादळी वारा आणि गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता मात्र राज्यातील काही शहरांमध्ये तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागात वातावरण कोरडे राहणार आहेत. तर काही भागात तापमान मात्र 37 अंशांच्या वर जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह किनारपट्टी भागाला उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांसाठी मुंबईत कमाल तापमान हे 39 अंश सेल्सिअस राहील आणि नंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या वेळी तापमान हे सामान्य तापमानापेक्षा 4.5 अंश सेल्सिअस पुढे जाण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान हे किमान 37 अंश सेल्सिअस असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह किनारपट्टी भागात उष्णतेची लाट
मुंबईसह उत्तर कोकणात पुढील दोन दिवस गरम राहतील असं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याचे कारणही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे कारण सौराष्ट्र म्हणजेच कच्छच्या काही भागांमध्ये तापमान खूप जास्त वाढले आहे. हे तापमान 38 अंश डिग्री च्या उंबरठ्यावर आहे. तिथे आधीच उष्णतेची लाट कायम आहे यात 14 मार्च रोजी उत्तर कोकणात येणारे खालच्या पातळीचे उष्ण आणि कोरडे वारे या मुंबईला उबदार करू शकतात आणि पुढील 48 तासात मुंबईचा तापमान वाढू शकते असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. दिनांक 14 मार्च साठी मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका
दरम्यान मागील आठवड्यात झालेल्या गारपीट वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या गहू हरभरा, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले असून फळबागांनाही मोठा फटका बसलाय. यामध्ये द्राक्ष यांना तडे गेले असून, आंबा मोहोर गळून पडला त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे, पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड, सटाणा, मालेगाव, तालुक्याला ही मोठा तडाखा बसलाय. अवकाळी सह गारपिटीने दिंडोरी तर पावसानं नाशिक-सिन्नर पेठ तालुक्यात मोठे नुकसान केले आहे काढण्यास आलेले द्राक्ष गहू हरभरा भाजीपाला आदी पिके मातीमोल झाली आहेत.