हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील वर्षीच्या खरीप हंगामात पिकवलेल्या कापसाला इतर शेतमालापेक्षा चांगला भाव मिळाला आहे. आता कापूस हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना कापसाला कमाल १२ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे. इतर बाजार समित्यांपेक्षा अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरवातीपासूनच कापसाला चांगला भाव मिळत आला आहे.
दिनांक 25 मार्च रोजी अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी विठ्ठल तुकाराम झटाले गाव पुंडा यांना बारा हजार रुपयांचा कमाल भाव प्रति क्विंटल कापसाकरिता मिळाला आहे. हा कापूस खरेदीदार हरी शंकर यांनी खरेदी केला आहे.
कापसाच्या बियाण्यांची किंमत वाढण्याची शक्यता
कापसाच्या वाढत्या भावाचा परिणाम आगामी खरीप हंगामापर्यंत जाणवणार आहे. आतापर्यंतच्या वाढत्या दराने खासगी कंपन्यांसह व्यापाऱ्यांनाही हैराण केले आहे. सध्या कापूस हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे.मात्र यानंतर शेतकऱ्यांना बियाणांच्या वाढत्या दराचा सामना करावा लागणार आहे. महागाईचा सामना करण्यासाठी त्यांना सज्ज राहावे लागेल. शेतकरी आधीच खते आणि डिझेलच्या महागाईशी झगडत आहेत. यंदा कापसाचा विक्रमी भाव 11 हजार रुपये प्रतिक्विंटल झाला आहे, त्यामुळे येत्या खरिपात कापसाचे क्षेत्र वाढणे स्वाभाविक आहे. कापूस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांनी त्याची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. बियाणे उत्पादन आणि संशोधन इत्यादींचा खर्च पाहता दर वाढण्याची अपेक्षा बियाणे उत्पादकांनी व्यक्त केली आहे.