राज्यातील 15 जिल्ह्यांत विजांसह, वादळी पावसाची शक्यता तर 4 जिल्ह्यात उष्णतेची लाट

Weather Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , मान्सूनचे(Monsoon) आगमन अंदमानच्या बेटावर झाले आहे. हळूहळू मान्सून पुढे कूच करतो आहे. लवकरच महाराष्ट्रातही मान्सून दाखल होईल अशी आशा आहे. दरम्यान आज सकाळपासून राज्यातल्या बहुतांशी भागामध्ये ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील १५ जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता तर ४ जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असण्याची शक्यता असून आज हवामान विभागाकडून या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

अंदमानच्या समुद्रानंतर सध्या बंगालच्या उपसागरात प्रगती करीत असलेला र्नैऋत्य मोसमी पाऊस (Monsoon) पुढील दोन ते तीन दिवसांत दक्षिण अरबी समुद्रात पोहोचणार आहे. सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे सध्या देशातील पूर्वोत्तर भाग आणि दक्षिणेकडील राज्यांत काही भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस होत असून, महाराष्ट्रातही काही भागात पावसाची हजेरी आहे.

नियोजित वेळेआधीच मान्सूनची एंट्री

यंदा नियोजित वेळेपेक्षा तब्बल सहा दिवस आधी म्हणजे १६ मे रोजी मोसमी वारे सक्रिय होऊन अंदमानात मोसमी पाऊस दाखल झाला. १७ मे रोजी मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही. मात्र, १८ मे रोजी त्यांनी उत्तर-पूर्व दिशेने बंगालच्या उपसागरात प्रगती केली. दक्षिणेच्या बाजूने मात्र त्यांनी अद्याप प्रगती केलेली नाही. मात्र, पोषक वातावरण असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे (Monsoon) दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरासह दक्षिण अरबी समुद्रापर्यंत मजल मारतील, अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

चेरापुंजी येथे २०० ते २५० मिलिमीटर पावसाची नोंद

पूर्वोत्तर भागातील आसाम, मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आदी राज्यांसह पश्चिम बंगाल, त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ आदी भागांमध्ये पूर्वमोसमी (Monsoon) पावसाने जोर धरला आहे. पावसात आघाडीवर राहणाऱ्या चेरापुंजीमध्येही सध्या जोरदार पाऊस होत असून, या भागात २०० ते २५० मिलिमीटर पावसाची नोंद होत आहे.