हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागामध्ये पावसाचा (Weather Update) जोर ओसरला असला तरी विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरु आहे. राज्यातल्या अनेक भागात पावसाने थोडी उसंत घेतली असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान आज विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
हवामान स्थिती
अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे ओमानकडे सरकून विरले. तर पूर्व किनाऱ्यावरील उत्तर ओडिशा आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाकडे सरकून निवळून (Weather Update) गेले. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकत असून, राजस्थानच्या बिकानेरपासून आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पश्चिम किनाऱ्याला गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा पुन्हा तयार झाला असून, महाराष्ट्राच्या मध्यावर पूर्व-पश्चिम परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोडक्षेत्र तयार झाले आहे.
सोमवारी (ता. १८) विदर्भात जोरदार, तर कोकण, घाटमाथ्यावरही पावसाची संततधार सुरू होती. मंगळवारी (ता. १९) राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली होती. राज्यात ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. आज (ता. २०) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप (Weather Update) मिळण्याचा अंदाज आहे.
हवामान तज्ञ् के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १९ रोजी विदर्भात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यातही गडचिरोली आणि हिंगणघाट भागात मुसळधार पाऊस झाला आहे.