Bee Keeping : सोन्यापेक्षाही महाग असते मधमाशीचे विष; मधमाशी पालनासाठी वाचा ‘ही’ माहिती

Bee Keeping Venom Is More Expensive
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकरी सध्या शेतीला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन (Bee Keeping) व्यवसाय करत आहेत. या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान देखील दिले जात आहे. मधुमक्षिका पालनातून शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक भरभराट झाली आहे. मात्र आता मधुमक्षिका पालनातून केवळ मध निर्मितीच नाही तर मधमाशीच्या डंखातून मिळणाऱ्या विषालाही बाजारात चांगली किंमत असते. ही किंमत ऐकून तुमच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाही. मधमाशीच्या (Bee keeping) विषाला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति किलोसाठी जवळपास दोन कोटींपर्यंतचा दर मिळतो.

भारतामध्ये जवळपास 60 लाखांहून अधिक शेतकरी मधुमक्षिकापालन (Bee Keeping) हा व्यवसाय करतात. यामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक शेतकरी मधुमक्षिका पालन करत असून, त्या ठिकाणी शेतकरी आता मधमाशांच्या डंखातून मिळणारे विष जमा करत आहेत. सर्वसाधारणपणे मधमाशांचे पालन हे मध गोळा करण्यासाठी केले जाते. मात्र आता उत्तरप्रदेशातील शेतकरी सोन्यापेक्षा अधिक किंमत असलेल्या या मधमाशांच्या विषापासून चांगली कमाई करत आहे. उत्तरप्रदेशातील मधमाशींचे हे विष देशांतर्गत मागणीसह कॅनडा, स्पेन, अफगाणिस्थान या देशांमध्ये देखील पाठवत आहेत.

कुठे होतो उपयोग? (Bee Keeping Venom Is More Expensive)

मधमाशांच्या विषाचा उपयोग हा कॅन्सर या आजाराच्या गाठी, एडस या आजारावरील औषधे बनवण्यासाठी होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मधमाशांच्या विषाला मोठी मागणी असून, मधमाशांचे हे विष सर्वसाधारणपणे 10 ते 15 हजार रुपये प्रति ग्रॅम इतक्या दराने विक्री केले जाते. या विषापासून मज्जासंस्थेसह अनेक गंभीर आजारांवरील औषधे देखील तयार केली जातात.

किती मिळतो दर?

मधुमक्षिका पालन करणाऱ्या एका शेतकऱ्याने याबाबत बोलताना म्हटले आहे की, एका पेटीत सुमारे 25,000 मधमाश्या असतात. वर्षभरात सुमारे 1700 पेट्यांमधून एक किलो विष मिळते. शुद्धतेनुसार या मधमाशांच्या विषाला बाजारात 70 लाख रुपयांपासून ते 2 कोटी रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळतो. मधुमक्षिका पालनासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात असून, शेतकऱ्यांना अनुदान देखील दिले जाते. यामुळे मधुमक्षिका पालनातून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत झाली आहे.

Gorakshnath Thakare
सकाळ, ABP माझा, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. शेती क्षेत्रात विशेष रस असून शेतमाल प्रक्रिया उद्योग, बाजारभाव, वायदेबाजार, तंत्रज्ञान आदी विषयांची आवड आहे.