हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी झाल्याने, राज्यातील किमान तापमानात वाढ (Weather Update) झाली आहे. परिणामी, राज्यातील गारठा कमी झाला असून, दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढला आहे. या उन्हाच्या चटक्यासोबतच आज राज्यात किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच 11 फेब्रुवारीनंतर राज्यातून थंडी हळूहळू काढता पाय घेऊ शकते. 11 तारखेनंतर राज्यात तापमानात वाढ होईल. कोकण, मध्य महाराष्ट्रातील तापमानात वाढ होऊन उकाडा वाढेल. (Weather Update) असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.
किमान तापमानात वाढ (Weather Update Today 6 Feb 2024 Maharashtra)
अर्थात यावर्षी राज्यातील थंडीचा मुक्काम हा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कायम राहणार आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यातील सर्वच भागांमधील किमान तापमान हे 12 अंशाहुन अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. अर्थात मागील आठवड्याच्या तुलनेत राज्यातील किमान तापमानात 3 ते 4 अंशांची वाढ नोंदवली गेली आहे. धुळे, निफाड, जळगाव या ठिकाणी मागील आठवड्यात 10 अंशाखाली असलेले तापमान सध्या 12 अंशांच्या पुढे वाटचाल करत आहे. त्यामुळे राज्यातून थंडी गायब होणार असून, उन्हाळाची चाहूल दिसून येत आहे.
उत्तरेत पावसाची शक्यता कायम
दरम्यान, देशाच्या उत्तरेकडील भागातही हवामानात बदल पाहायला मिळत असून, राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे सकाळच्या सुमारास कोवळे ऊन, दुपारी पाऊस तर संध्याकाळच्या सुमारास हलकी बर्फवृष्टी होत आहे. त्यातच दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी (एनसीआर) हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तरेकडील अन्य राज्यांमध्येही पावसाची शक्यता कायम आहे. हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. उत्तराखंड, जम्मू काश्मीर या हिमालयीन राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. त्यातच आजही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारताच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणा आणि आसामच्या काही भागात दाट धुक्याची चादर पाहायला मिळू शकते. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.