हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक भागात उन्हाची काहिली वाढली (Weather Update) असून, बुधवारी (ता.8) सोलापूर येथे उच्चांकी 37.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. राज्यात थंडी काही प्रमाणात कमी झाली असून, उत्तरेकडे मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन थंडीत वाढ झाली आहे. दरम्यान, विदर्भातील काही भागांमध्ये बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या आर्द्रतायुक्त चक्राकार वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. शनिवारपासून (ता.10) पुढील तीन दिवस राज्यात प्रामुख्याने विदर्भ-मराठवाड्यात पावसाची शक्यता (Weather Update) आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने व्यक्त आहे.
दोन दिवस ढगाळ वातावरण (Weather Update Today 8 Feb 2024)
पूर्व विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटकपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसास पोषक तयार होत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आज आणि उद्या अर्थात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहील. शनिवारपासून विदर्भातील आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे. त्यांनतर 12 फेब्रुवारीनंतर राज्यातील वातावरण पुन्हा पूर्वपदावर येणार आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
उत्तर-पूर्व भागात पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज उत्तर-पूर्व भारतातील अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस तर काही भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये देखील आज पाऊस होण्याची शक्यता आहे. या उत्तर-पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
कमाल तापमानात मोठी वाढ
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली असून, सध्या राज्यातील पुणे, कोल्हापूर, सांगली, अकोला, वाशीम, यवतमाळ या भागांमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सोलापूर येथे बुधवारी यावर्षीचे आतापर्यंतचे उच्चांकी 37.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात धुळे, निफाड, जळगाव या ठिकाणी 10 अंशांखाली असलेला किमान तापमानाचा पारा सध्या अनुक्रमे 11.5, 11.6, 14.5 अंश सेल्सिअस असल्याचे दिसून येत आहे. तर उर्वरित राज्यात मागील 24 तासांमध्ये 11 ते 22 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले आहे.