कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत लिलाव सुरु , पहा काय आहे दर ?

Onion
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या लासलगाव मध्ये कांद्याचे लिलाव सुरु झाले आहेत. बाजार समित्यांमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत झाल्याने आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील १३ दिवसांपासून नाशिक जिल्हा बंद असल्यामुळे बाजार समित्या बंद होत्या. आता १५ बाजार समित्या सुरू झाल्या आहेत.

नियमांचे पालन करावेच लागणार

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे लासलगावसह जिल्ह्यातील कांद्याच्या प्रमुख 15 समित्या १२ मे पासून बंद ठेवण्यात आल्या होत्या. आज पासून लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा व धान्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत. लिलावाला येताना शेतकऱ्यांनी करोनाची चाचणी करून तसेच वाहन नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानंतर बाजार समिती आवारात शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालासह प्रवेश दिला जाणार आहे. अशी माहिती लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली आहे.

कांद्याला काय मिळाला दर ?

दरम्यान लासलगाव बाजार समितीमध्ये 500 वाहनातून आलेल्या कांद्याला कमाल 1571 रुपये तर किमान 700 रुपये तर सर्वसाधारण 1400 रुपये इतका भाव मिळाला. बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले आहे की , गेल्या तेरा दिवसांपासून बाजार समितीमध्ये कांदा लिलाव हे बंद होते ते आज सुरू झाल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान पाहायला मिळत आहे. बाजार समितीमध्ये येताना शासनाच्या नियमांचे पालन करून शासनाने बाजार समिती सुरू ठेवावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.