हॅलो कृषी ऑनलाईन: यंदा कापूस बियाण्यांची (Cotton Seed) विक्री 16 मे पूर्वी करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. यामागे शेंदरी बोंडअळीचा(Pink Bollworm) होणारा प्रादुर्भाव हे कारण देण्यात येत आहे. कारण हंगामपूर्व कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, यामुळे कापूस बियाणे (Cotton Seed) विक्रीची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे.
राज्यात 2017 च्या खरीप हंगामातील शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भावाचा अनुभव लक्षात घेऊन कृषी विभागाकडून (Agriculture Department) राबविण्यात आलेल्या उपाय योजनांमुळे शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळून आला होता. यंदाच्या खरीप हंगामामध्ये (Kharif Season) सुद्धा शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून हा निर्णय राबविण्यात येत आहेत.
या प्रतिबंधात्मक उपायानुसार 16 मे 2024 पासून कापूस बियाणे (Cotton Seed) शेतकर्यांना उपलब्ध होणार आहे. त्यापूर्वी बियाण्याची विक्री केल्यास संबंधित कंपनी, किरकोळ विक्रेत्यावर कारवाई होणार आहे. या संदर्भात कृषी विभागाने विभागीय कृषी सहसंचालक यांना आदेशित केले आहे.
कापूस तज्ज्ञांच्या (Cotton Expert) शिफारसीनुसार शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित न झाल्यास प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. हंगाम पूर्व कापूस लागवड (Pre Season Cotton) झाल्यास शेंदरी बोंड अळीच्या जीवन क्रमास पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत यंदा शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावास आळा घालण्याकरिता हंगाम पूर्व कापसाची लागवड (Cotton Sowing) होणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे.
लागवड 1 जून नंतरच (Cotton Seed Sowing)
16 मे पासून कापूस बियाणे (Cotton Seed) शेतकर्यांना (Farmers) उपलब्ध करून देऊन प्रत्यक्ष लागवड मात्र 1 जून 2024 नंतरच होणार आहे. कटाक्षाने पालन केल्यास शेंदरी (गुलाबी) बोंड अळीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रित करणे शक्य होणार आहे.
याकरिता क्षेत्रीय स्तरावर कटाक्षाने पालन करणे बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (Agriculture Officer) यांनी काटेकोर नियोजन करून अंमलबजावणी करावी व विभागीय कृषी सहसंचालक (Joint Director of Departmental Agriculture) यांनी त्यावर सनियंत्रण ठेवावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
कापूस बियाणे (Cotton Seed) पुरवठा करण्याबाबत निर्देशित दिनांक पुढील प्रमाणे आहेत
उत्पादक कंपनी ते वितरक – 1 ते 10 मे 2024
वितरक ते किरकोळ विक्रेता – 10 मे 2024 नंतर
किरकोळ विक्रेता ते शेतकरी – 15 मे 2024 नंतर
शेतकर्यांना प्रत्यक्ष लागवड – 1 जूननंतर