हॅलो कृषी ऑनलाईन : अलिकडच्या काळात शेतीत यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. हळूहळू शेतातील बैलांचा (Blind Bull) वापर कमी होताना दिसतो आहे. मात्र, काही शेतकरी असे आहेत की, ते बैलांनीच आपल्या शेतीची मशागत करतात. मात्र, आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या त्याच्या सोन्या बैलाच्या अतूट नात्याबद्दल जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे हा सोन्या बैल दोन्ही डोळ्यांनी अंध (Blind Bull) असूनही, तो आपल्या मालकासोबत राबतो आहे.
सोन्याचे डोळे का गेले? (Blind Bull Solapur Farmer)
इंद्रसेन गोरख मोटे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते वाळूज (ता.मोहोळ, जि.सोलापूर) येथील रहिवासी आहेत. त्यांचा सोन्या बैल पाच वर्षांचा असल्यापासून तो शेतीच्या कामात मदत करू लागला. दरम्यानच्या काळात त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागल्याने, पशूतज्ज्ञांनी मांस वाढल्याचे कारण देत दोन्ही डोळे काढण्याचा सल्ला दिला आणि तो कायमचा अंध बनला. पण सोन्यावरील प्रेमापोटी शेतकरी इंद्रसेन मोटे यांनी त्याचा मायेने सांभाळ केला आहे.
शेतकऱ्याने 18 वर्षे सांभाळले
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ- वैराग मार्गावर वाळूज येथे अगदी रस्त्यालगत इंद्रसेन मोटे यांची बारा एकर शेती आहे. यामध्ये दहा-दहा गुंठे कडवळ, मका अशी चारापिके आलटून पालटून ते घेतात. याचबरोबरीने सोयाबीन, तूर, उडीद, ज्वारी आणि ऊस लागवड आहे. घरच्या गाईच्या पोटी 2005 मध्ये सोन्या बैल झाला. पुढे तीन वर्षांनी सोन्या हाताला आला. तो कामाला चालू लागला. 2010 पर्यंत तर तो शेतीकामात चांगलाच तयार झाला. मात्र, 2010 मध्ये सोन्या कायमचा अंध झाला. मात्र, आज 18 वर्षे झाली, तरीही त्याच्यावरील शेतकरी इंद्रसेन मोटे यांचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.
सोन्या का राबतो शेतात?
सोन्याचे दोन्ही डोळे निकामी (Blind Bull) झाले, पण डॅाक्टरांनी त्याच्या आरोग्यासाठी सल्ला दिला. त्याच्या अंगातून सतत पाणी निघायला हवे. अर्थात, त्याला घाम यायला हवा, तरच त्याची तब्येत चांगली राहील,त्याला कामाची सवय ठेवा, असे सांगितले. पण अंध असल्याने तो कितपत आणि कसे शेती काम करणार, पण त्याच्या आरोग्यासाठी ते आवश्यकच होते. त्यामुळे जमेल तसे इंद्रसेन यांनी त्याला उठायला, चालायला शिकवले. हळू-हळू औतावरही कामाला जुंपला. अगदी नांगरणी, कोळपणी अशी सर्व कामे सोन्या करतो, पण तेवढ्यापुरतेच. त्याला त्रास होईल, अवजड होईल, असे कोणतेही काम त्यांनी आजतागायत दिले नाही. या जेमतेम कामामुळेच आज एवढ्या वर्षानंतरही त्याची तब्येत चांगली आणि ठणठणीत आहे.