हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींना (Papaya Farming) तोंड द्यावे लागते. यात प्रामुख्याने दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस ही नैसर्गिक संकटे तर असतातच. याशिवाय शेतकऱ्यांना सरकारच्या आडमुठे धोरणामुळे आपल्या मालाला अत्यंत कमी दर मिळण्याच्या प्रकाराला देखील सामोरे जावे लागते. मात्र, अशातच आता ग्रामीण भागांमध्ये शेती करताना शेतकऱ्यांना शत्रुत्व किंवा अन्य प्रकारातून समाजकंटकांकडून पिकांच्या नासधुसीला देखील सामोरे जावे लागत आहे. एका शेतकऱ्याच्या शेतातील सुमारे 550 पपईची झाडे (Papaya Farming) तोडून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
भर उन्हाळ्यात जगवली झाडे (Papaya Farming Nandurbar Farmer)
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील इस्लामपूर गावातील पियुष बेदमुथा असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी पियुष बेदमुथा यांनी आपल्या शेतात पपईची लागवड (Papaya Farming) केली होती. भर उन्हाळ्यात आणि पाणी टंचाईचे सावट असताना देखील त्यांनी पपईचे पीक जगविले होते. परंतु एका माथेफिरूने शेतात जाऊन, धारदार शस्त्राच्या मदतीने 550 पपईची रोपे कापून टाकली आहेत. ज्यामुळे शेतकरी पियुष बेदमुथा यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर
पियुष बेदमुथा हे आपल्या सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांना हा प्रकार आढळून आला आहे. अज्ञात इसमाने धारदार शस्त्राच्या सहाय्याने त्याच्या शेतातील पपईची झाडे तोडून फेकली आहेत. तसेच शेतातील मजुरांसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे देखील नुकसान करून पाण्याचे नऊ नळ देखील तोडले आहेत. हा संपूर्ण प्रकार रात्रीच्या वेळी अज्ञातांनी केला आहे. ज्यामुळे या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर असून, घटने प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान
विशेष म्हणजे शेतकरी पियुष बेदमुथा यांनी भर उन्हाळ्यात मोठ्या शिताफीने पाण्याचे नियोजन करून पपईची बाग जगवली होती. सध्या त्यांच्या बागेतील पपईच्या झाडांना फळधारणा होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, काही समाजकंटकांना त्यांची ही पपई बाग सहन झाली नाही. ज्यामुळे अज्ञाताने रात्रीच्या वेळी त्यांच्या शेतातील पपईची 550 झाडे कापून टाकली आहेत. ज्यामुळे शेतकरी पियुष बेदमुथा यांचे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, याआधी देखील या जिल्ह्यातील काही भागांमध्ये अशाच पद्धतीने शेतीच्या नासधुसीचे प्रकार समोर आले असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.