DAP Fertilizer: शेतकऱ्यांनो डीएपी खतास ‘ही’ पर्यायी खते वापरा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामात काही ठराविक खताची (DAP Fertilizer) कमतरता नेहमी आढळते. राज्यामध्ये खरीप पेरणीला (Kharif Sowing) सुरुवात झाली असून शेतकरी वेगवेगळ्या खताची (Kharif Fertilizer) खरेदी करत आहे. विशेषतः डीएपी खताची शेतकर्‍यांकडून जास्त मागणी आहे. डीएपी (Di-Ammonium Phosphate) खता मध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत.  

डीएपी खताची (DAP Fertilizer) कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत (Alternative Fertilizers) वापरणे गरजेचे आहे. स्फुरदयुक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे.

एसएसपी (SSP) खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-16 टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया (Urea) अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डीएपी खतास चांगला पर्याय आहे. 

एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके (NPK)-10:26:26, एनपीके-20:20:0:13, एनपीके-12:32:16 व एनपीके-15:15:15 या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुध्दा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो. 

त्याच बरोबर टीएसपी (Triple Super Phosphate) या खता मध्ये 46 टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून डीएपी खताच्या (DAP Fertilizer) एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टीएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखील डीएपी खतास उत्तम पर्याय आहे.

चालू खरीप हंगामामध्ये शेतकर्‍यांनी (Farmers) केवळ डीएपी खतावरच अवलंबून न राहता बाजार मध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून (Agriculture Department) राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यात इतर राज्यांच्या मानाने अग्रेसर आहे. जर शेतकर्‍यांनी उपलब्ध खताचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यांना खरीपात खत टंचाई (Fertilizer Shortage) सारख्या समस्येला सामोरा जावे लागणार नाही (DAP Fertilizer).