हॅलो कृषी ऑनलाईन : बाजारात टोमॅटोचे भाव गडगडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारनं राजकारण थांबवावं आणि टोमॅटो उत्पादकांना दिलासा द्यावा अन्यथा सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही दारात टोमॅटो ओतून आंदोलन करू असा इशारा किसान सभेचे नेते अजित नवले यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना अजित नवले म्हणाले, “अचानक टॉमेटोचे दर कोसळल्यानं राज्यातील टॉमेटो उत्पादक शेतकरी अत्यंत संकटात सापडले आहेत. ते दीनवाण्या अवस्थेत जाऊन पोहचले आहेत. लाखो रुपये खर्च करुन उत्पादन केलेला टॉमेटो रस्त्यावर, ओढ्या नाल्यांमध्ये आणि बांधावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक कुणाचंही याकडे लक्ष नाही. मान-अपमान, एकमेकांवर चिखलफेक यातच हे सर्व राजकारणी मश्गुल आहेत.”
पुढे बोलताना नवले म्हणाले . “शेतकऱ्यांबद्दल कुणालाही आस्था नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदतो आहे. सरकारने हा खेळखंडोबा आता थांबवावा. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सहकार, पणन आणि कृषी विभागाने एकत्र यावं. कोल्ड स्टोरेजचा उपयोग करुन हा माल साठवता येईल का, प्रक्रिया उद्योगांना सोबत घेऊन नाशिवंत शेती माल साठवता येईल का, कर्ज देता येईल का? अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा देता येईल का यावर गांभीर्याने पुढाकार घ्यावा,” असं अजित नवले यांनी सांगितलं.