हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण मराठवाड्यात दाणादाण उडवून देणाऱ्या पावसाने काहीशी उसंत दिली आहे. मराठवाड्यात यंदा खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची चिंता मात्र मिटली आहे. कारण मराठवाड्यासाठी जीवदान ठरलेले जायकवाडी धरण यंदा 98 . 40 टक्के भरले आहे. जे आगामी रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरणार आहे.
दरम्यान आज 1ऑक्टोबर सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, गेट क्रमांक 10 ते 27असे एकूण 18 गेट 3 फूट उंचीवरून विसर्ग करण्यात येत होता. ते आता कमी करून 2.0 फुट उंचीवर करण्यात आला आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात 56,592 क्युसेक विसर्ग करण्यात येत होता मात्र आज हा विसर्ग 18,864 क्यूसेक ने कमी करून 37,728 क्यूसेक ने विसर्ग सुरु ठेवण्यात येणार आहे अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. तर परभणी जिल्ह्यामधील मुदगल उच्च पातळी बंधारा मधून 1 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता 1 लाख 16 हजार 804 क्युसेक मे गोदापात्रात विसर्ग चालू होता .
दरम्यान पावसाने उसंत घेतल्याने धरणात पाण्याची आवक देखील आधीपेक्षा कमी प्रमाणात होते आहे त्यामुळे विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील 12 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांची हानी झाली आहे. सर्वात जास्त फटका हा मराठवाड्यातल्या उभ्या पिकांना बसला आहे मात्र पिकांचे पंचनामे अद्यापही सुरू असल्याने नुकसान ग्रस्त क्षेत्राचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे .