रोजगार हमी योजना (नरेगा) जॉब कार्ड; जाणून घ्या सर्व माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मनरेगा ग्रामीण विकास आणि रोजगार मिळवून देण्याचे दुहेरी ध्येय साध्य करते. मनरेगा मध्ये नमूद केलेली कामे ग्रामीण विकास उपक्रमांकडे केंद्रित असतात. ज्यामध्ये ग्रामीण कनेक्टिव्हिटी, जलसंधारण, पूरनियंत्रण आणि संरक्षण बांध तसेच दुरुस्ती सीपेज टाक्या, लहान बंधारे, वनीकरण, उत्खनन, नवीन तलाव इत्यादी कामांवर भर दिला जातो. तसेच या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारास जमीन सपाटीकरण, वृक्षारोपण यांसारखी देखील कामे दिली जातात.

नरेगा जॉब कार्ड अंतर्गत राबविण्यात येणारी कामे कोणती?
नरेगा जॉब कार्ड ही केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवली जाते. यामध्ये असुरक्षित कुटुंब ज्यांना स्थिर उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध नाही. तसेच विधवा महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे देशातील नागरिक यांच्यासाठी उत्पन्नाचा स्थिर स्त्रोत मिळवून देण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने राबविली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालयाने वैयक्तिक कामगार लाभार्थ्यांच्या कामांवर लक्ष केंद्रित करून त्यांना कंपोस्ट खड्डे खोदणे, विहीर खाणने किंवा दुरुस्त करणे, वृक्षलागवड करणे, कृषी क्षेत्राचे दुरुस्ती करणे ही कामे त्यांच्याकडून करून घेतली जातात. ग्रामीण विकास कार्यक्रम महात्मा गांधी रोजगार हमी कायदा २०१५ नुसार ग्रामीण भागात राबवले जातात.

(नरेगा) जॉब कार्ड योजनेचे उद्दिष्ट काय?
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) या जॉब कार्ड द्वारे ग्रामीण भागातील लोकांना शंभर दिवसांची रोजगार हमी दिली जाते. या योजनेअंतर्गत अकुशल ग्रामीण नागरिकांना रोजगार दिला जातो. ज्याद्वारे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते आणि ते त्यांच्या कुटुंबाचे स्वावलंबी पणाने पालनपोषण करू शकतात. केंद्र सरकारच्या मनरेगा योजना ही एक ग्रामीण भागातील गरीब नागरिकांसाठीची रोजगार योजना आहे. या योजनेचा लाभ गावातील आणि शहरातील लोक घेऊ शकतात त्यासाठी त्यासाठी अर्ज कारण्याचीपद्धत या लेखात खाली दिलेली आहे ती तपासावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी (नरेगा) योजनेअंतर्गत केली जाणारी प्रमुख कामे कोणती?

मनरेगा योजनेअंतर्गत केली जाणारी कामे ही चार श्रेणीमध्ये आहेत ती खालील प्रमाणे:

श्रेणी-१ :
या श्रेणीमध्ये सार्वजनिक आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाशी निगडित असणारी कामे सामाविष्ट केली गेली आहेत. ज्यामध्ये पारंपारिक जलस्रोत आणि पुनरुज्जीवन, पाणलोट व्यवस्थापन, सूक्ष्म आणि लघु सिंचन सुविधांची कामे, जलसंधारण संरक्षण, कुरण विकास इत्यादी कामे समाविष्ट केली गेली आहेत.

श्रेणी-२ :
या श्रेणीमध्ये मासेमारी, पशुसंवर्धन, पडीक क्षेत्र विकसित करणे, इंदिरा गांधी आवास योजनेत काम करणारे कामगार इत्यादी संबंधित कामे समाविष्ट आहेत.

श्रेणी-३ :
या श्रेणीमध्ये कृषी उत्पादनाच्या साठवणुकीसाठीची कामे महिला बचत गटांसाठी केली जातात. तसेच कृषी उत्पादकता वाढवणे, भौतिक संसाधनांच्या निर्मितीची कामे व खतांची रचना इत्यादी कामे समाविष्ट केली गेली आहेत.

श्रेणी-४ :
या श्रेणीमध्ये क्रीडा मैदान, बांधकाम कार्य, ग्रामीण स्वच्छता कार्य, आपत्कालीन व्यवस्थापन, इमारत बांधकाम, रस्ता इत्यादी संदर्भातील कामे केली जातात.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना नरेगा सोबतीची निवड आणि पात्रता

नरेगा सोबतीची निवड अधिकारी करतात. यासाठी अर्जदाराने ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावा लागतो. यानंतर अर्जाची पडताळणी होते आणि नरेगा सोबतीची भरती ग्रामपंचायत द्वारे केली जाते. या सोबतींची संख्या ही ग्रामपंचायतीमधील नरेगा कामगारांच्या संख्येवर अवलंबून असते. यांची निवड प्रक्रिया पात्रता पुरुष असल्यास, किमान आठवी पास आणि महिला देखील आठवी पास असणे आवश्यक आहे. जर या अर्जामध्ये आठवी पास स्त्री उपलब्ध नसेल, तर पाचवी पास महिलेची नरेगा सोबती म्हणून निवड केली जाते.

मनरेगा जॉब कार्ड पात्रता काय आहे?

–अर्जदार हा भारताचा कायमस्वरूपी रहिवासी असावा
–या योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदाराचे वय १८ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
–अर्जदार अकुशल श्रमिक असणे आवश्यक आहे.

नरेगा अंतर्गत जॉब कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
–उत्पन्नाचा दाखला व प्रमाणपत्र
–पासपोर्ट आकाराचे फोटो
–पत्त्याचा पुरावा
–रेशन कार्ड
–आधार कार्ड
–मोबाईल नंबर

नरेगा जॉब कार्ड योजना ऑफलाईन अर्ज नोंदणी (Registration) प्रक्रिया काय आहे?

–नरेगा योजना अंतर्गत ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्य ज्यांचे नाव, वय व पत्ता ग्रामपंचायतीत सादर करावी लागतात.
–त्यानंतर या सर्व गोष्टींची पडताळणी केली जाते.
–पडताळणीनंतर घरांची पंचायत नोंदणी आणि जॉब कार्ड सदस्याच्या तपशील आणि फोटो सहित जॉब कार्ड जारी करण्यात येते.
–नोंदणीकृत व्यक्ती काम करण्यासाठी पंचायत किंवा कार्यक्रम अधिकारी यांना किमान १४ दिवस सतत काम करण्यासाठी लेखी अर्ज सादर करू शकतो.
–अर्ज केल्यानंतर त्या अर्जदाराला दररोज बेरोजगारी भत्ता दिला जातो.
–या योजनेअंतर्गत सुनिश्चित झालेल्या कायद्याअंतर्गत स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जात नाही. त्यामुळे स्त्री आणि पुरुषाला समान रोजगार मिळतो.
–सर्व प्रौढ नोकरीसाठी अर्ज करू शकतात.