हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात रब्बी हंगामात हरभरा या पिकाची लागवड प्रामुख्याने केली जाते. सध्या राज्यातील खरीप हंगाम संपुष्टात येत असून रब्बी हंगामाच्या तयारीला शेतकरी लागले आहेत. आजच्या लेखात आपण हरभरा पिकाच्या फुले विक्रम,पीडीकेव्ही कांचन ( एकेजी 1109) या वाणांविषयी जाणून घेणार आहोत. याबाबतची माहिती राजेश डवरे कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम यांनी दिली आहे.
(१) फुले विक्रम:
हा हरभऱ्याचा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केला असून या वाणाची शिफारस संपूर्ण महाराष्ट्रात पेरणी करण्याकरता केली आहे. या वानाचा परिपक्वता कालावधी साधारणता 105 ते 110 दिवस आहे. या वानाच्या वाढीचा कल उंच असल्यामुळे म्हणजे साधारणता या जातीची उंची 55 ते 60 सेंटिमीटर असल्यामुळे या जातीला घाटे जमिनीपासून एक फुटावर लागतात त्यामुळे यांत्रिक पद्धतीने काढणीस म्हणजेच कम्बाईन हार्वेस्टरने काढणीस हा वाण उपयुक्त आहे. या जातीची शिफारस जिरायती बागायत व उशिरा पेरणीसाठी सुद्धा करण्यात आली असून दाण्याचा आकार मध्यम असून हा वाण मर रोग प्रतिकारक्षम आहे. या जातीचे जिरायतीमध्ये सरासरी प्रति हेक्टर 16.37 क्विंटल तर बागायतीमध्ये सरासरी प्रति हेक्टर 22.25 क्विंटल तर उशिरा पेरणी मध्ये सरासरी प्रति हेक्टर 21.12 क्विंटल एवढ्या उत्पादनाची प्रायोगिक निष्कर्षात नोंद झाली आहे.
(2) पीडीकेव्ही कांचन ( एकेजी 1109) :
हे हरभऱ्याचा वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी वर्ष 2017 ला प्रसारित केला असून या वानाचा परिपक्वता कालावधी साधारणतः 105 ते 110 दिवस आहे. विदर्भात ओलिताखाली लागवड करण्यासाठी हा वान उपयुक्त असून हा वाण मध्यम जाड पाण्याचा म्हणजे साधारण शंभर दाण्याचे वजन 19.7 ग्रॅम एवढे आहे. हा वान मर रोग प्रतिकारक्षम असून याची हेक्टरी उत्पादकता 21 ते 23 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे.
टीप :
(१) शेतकरी बंधुंनो वर निर्देशित दोन अद्यावत कृषी विद्यापीठ शिफारशीत वाणांची फक्त गुणवैशिष्ट्ये आपणासाठी माहिती करता दिली असून आपल्या स्थानिक आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घेऊन तसेच आपणाकडे असणारा जमिनीचा प्रकार हवामान ओलित व इतर स्थानिक परिसंस्थेचा व बाजारपेठेचा विचार करून योग्य त्या वाणाची निवड करावी. वाणाची उत्पादकता ही स्थानिक हवामान जमीन तसेच पीक उत्पादनाच्या संदर्भा मधील शिफारशीत एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान वर अवलंबून असते याची नोंद घ्यावी.
(२) वर निर्देशित वाणाच्या बियाण्याचा संदर्भामध्ये महाबीज, संबंधित कृषी विद्यापीठे, नामांकित शासनमान्य शेतकरी उत्पादक कंपन्या, व इतर शासनमान्य बीज उत्पादक कंपन्या यांच्याशी संपर्क साधून आपण आवश्यकतेनुसार विचारणा करू शकता.