कर्नाटकात पाऊस घालतोय धुमाकूळ ; पहा राज्यात काय असेल स्थिती, ‘या’ भागात आज लावणार हजेरी

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक 22 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा च्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भासह उर्वरित राज्यात हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कुठे किती पाऊस

शनिवार दिनांक 20 रोजी दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर दिनांक 21 रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे 30 मिलिमीटर, कणकवली येथे वीस मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोल्हापुरातील चंदगड येथे 30 मिलिमीटर तर कागल आणि सोलापूरमधील करमाळा इथं प्रत्येकी दहा मिलिमीटर पाऊस पडला. उस्मानाबाद येथे दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

कमाल  आणि किमान तापमान

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 30 वर्षांच्या खालीच आहे. तर कोकण आणि विदर्भात कमाल तापमान अधिक असल्याचे दिसून आले. रविवारी दिनांक 21 रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी 35.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले तर बहुतांश ठिकाणी किमान तापमानातील वाढ कायम असून महाबळेश्वर येथे 17.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.अरबी समुद्रात पूर्व मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे या प्रणाली पासून महाराष्ट्र पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

आज या भागात राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

हवामान तज्ञ डॉक्टर के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व मध्य व पश्‍चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याच्या हवेच्या वरच्या थरातील चक्राकार सिस्टिम मूळ द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती महाराष्ट्रापर्यंत आहे परिणामी आज राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच मच्छीमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये अशा सूचना देखील देण्यात आले आहेत

आज दिनांक 22 रोजी रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, बीड, आणि उस्मानाबाद या भागात मेघगर्जनेसह आणि विजांसह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे. तर या भागाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कर्नाटकमध्ये 4 दिवसांपासून जोरदार पाऊस

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतात पावसाने थैमान घातलं आहे. चार दिवसांपासून कर्नाटकमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे कर्नाटकमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. रस्त्यावर आणि शेतात पाणीच पाणी झालं आहे. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कर्नाटकमध्ये आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झालाय. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आढावा बैठक घेत शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे.