हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरिपात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असले तरी आगामी काळात मात्र सोयाबीनचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावेत याकरिता महाबीजकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. याकरिता महाबीजकडून विशेष सोयाबीन बीजोत्पादन हा कार्यक्रम उस्मानाबाद जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे हा कार्यक्रम उस्मानाबादेतील 1301 हेक्टरवर उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन प्रक्रियेद्वारे राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
महाबीजकडून गावोगावी जनजागृती
उन्हाळी हंगामात सोयाबीनला चांगला उतार आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने एकरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन मिळेल असा आशावाद महाबिजचे व्यवस्थापक राजू माने यांनी व्यक्त केला आहे. उन्हाळी हंगामात सोयाबीन बिजोत्पादन प्रभावीपणे राबवले तर खरीप हंगामासाठी बियाण्याची तूट भासणार नाही. याकरिताच महाबिज गावोगावी जाऊन जनजागृती करीत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तडवळे येथे महाबीज तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आता उन्हाळी सोयाबीन हे आगामी खरीप हंगामात बियाणांसाठीच उत्पादन घेतले जाते. मात्र, याकरिता शेतकऱ्यांनी महाबीजकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. शिवाय शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेतले आणि उत्पादीत बियाणांची विक्री ही महाबिजकडेच केली तर बाजारभावापेक्षा अधिकचा दर दिला जाणार आहे. त्यामुळे पोषक वातावरणामुळे वाढणारी उत्पादकता आणि मिळणारा दर यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचा विश्वास महाबिजकडून व्यक्त केला जात आहे.
बीजोत्पादन करताना काय काळजी घ्यावी ?
हंगामापूर्वी केले जाणारे बीजोत्पादनावरच त्या हंगामातील उत्पादनक्षमता ही अवलंबून असते. त्यामुळे योग्य काळजी घेतली तरच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे कोणत्याही वाणाची वाणाची उत्पादन क्षमता ही त्याच्या अनुवंशिक गुणधर्मावर आधारीत असते. त्यामुळे उत्पादन क्षमता पिढ्यानिपढ्या टिकून ठेवायची असेल तर यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ असू नये हे सर्वात महत्वाचे आहे. बियाणामध्ये भेसळ ही पेरणी, काढणी, मळणी व पिशवीत भरण्यापूर्वी कधीही होऊ शकते. त्यामुळे 100 टक्के भेसळ टाळून बीजोत्पादन करणे महत्वाचे आहे.
पेरणी करताना घ्यावयाची काळजी
पेरणीसाठी बियाणांची पिशवी उलट्या बाजूने फोडावी, पिशवीवरील खूण, चिट्ठी याच्यासह बियाणाचा नमुना जपून ठेवावा. ज्यामुळे बियाणे सदोष आढळल्यास जपून ठेवलेले बियाणे नमुन्यांची उगवण क्षमता चाचणी घेणे शक्य होणार आहे. बीजप्रक्रिया झाल्यानंतर बियाणे बीज परीक्षणात पास झाल्यावर ते योग्य आकाराच्या पिशव्यात भरुन त्यास बीजप्रमाणीकरण यंत्रणेचे प्रमाणपत्र लावले जाते. असेच बियाणेच पेरणीसाठी वापरल्यास उत्पादनात वाढ होते.
बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण करण्यासाठी कागदपत्रे
— शेतकऱ्यांचा सातबारा
— आधार कार्ड
–बॅंक पासबूकची झेरॅाक्स
–ही कागदपत्रे जिल्हा महाबीज कार्यालयात जमा करावे लागणार आहे.
–त्यानंतरच आरक्षण करुन घेतले जाणार आहे.
संदर्भ : टीव्ही -९