हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामातील शेवटचे पीक तुरीचे पीक सध्या वावरात आहे. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीपासून शेतकऱ्यांनी आपली तूर वाचवली आहे. मात्र आता हे पीक अंतिम टप्प्यात असताना मागील दोन दिवसात झालेला पाऊस आणि सततचे ढगाळ वातावरण याचा फटका तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. सध्याच्या स्थितीत तूर पिकावर कोणता परिणाम होत आहे आणि काय काळजी घ्यावी याची माहिती डॉ.डी.डी.पटाईत(कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी) यांनी दिली आहे जाणून घेऊया
तुरीवर काय होतोय परिणाम ?
सततच्या ढगाळ वातावरणामध्ये तूरीवर शेंगा पोखरणा-या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तसेच शेंगमाशीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास तुरीमध्ये अडकण होऊ शकते.
कसे कराल व्यवस्थापन
१)शेंगा पोखरणारी अळी (हेलिकोवर्पा) करीता
–पुर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
–हेलिकोवर्पा अळीची आर्थिक नुकसानीची पातळी कळण्याकरिता प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत.
–शेतामध्ये इंग्रजी ” T ” आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावावेत जेणेकरून पक्षाद्वारे अळ्या वेचून खाल्याने प्रादुर्भाव कमी होईल.
–तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे आणि पोत्यावर पडलेल्या अळ्या वेळोवेळी जमा करून नष्ट कराव्यात.
किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर
इमामेक्टिन बेंझोएट ५ % – ४.४ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ८८ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५ टक्के- ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली किंवा इंडाक्झाकार्ब १४.५ टक्के- ८ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १६० मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % – ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली किंवा फ्लुबेंडामाईड २० % – ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १०० ग्रॅम किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल ९.३ % +लॅम्बडा साहॅलोथ्रीन ४.६ % (संयुक्त कीटकनाशक) – ४ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ८० मिली फवारावे.*
२) शेंगमाशी करीता
लॅम्बडा साहॅलोथ्रीन ५% – ८ मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर १६० मिली किंवा ल्युफेन्युरॉन ५.४ %- १२ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर २४० मिली फवारणी करावी.*
अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
☎ ०२४५२-२२९०००