हॅलो कृषी ऑनलाईन : कपाशी पिकावर मावा, पांढरी माशी, तुडतुडे यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यातील तुडतुडे या किडीचा विचार केला तर मागील काही वर्षापासून या किडीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्यामुळे कपाशीच्या उत्पादनामध्ये घट येत आहे. या लेखात आपण तुडतुडे या केळी बद्दल माहिती घेणार आहोत व तिचे नियंत्रणकसे करावे हे जाणून घेऊ.
तुडतुडे -एक रसशोषक किडी
हे प्रौढ तुडतुडे पाचरीच्या आकाराचे फिक्कट हिरव्या रंगाचे दोन ते चार मी. मी लांब असतात. पिल्ले प्रवडा सारखेच फिक्कट हिरव्या रंगाचे व त्यांना पंख नसतात.तुडतुडे यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते चालताना तिरके चालतात व चटकन उडी मारतात.तुडतुडे या किडीचे पिल्ले आणि प्रौढ पानांच्या खालच्या बाजूस राहून रस शोषण करतात. पानांमध्ये विषारी द्रव्य सोडल्यामुळे पानाच्या प्रकाश संश्लेषण क्रिया वर परिणाम होतो. सुरुवातीला लहान पिल्ले पानाच्या शिरेजवळ राहतात. मोठे झाल्यावर चपळपणे फिरताना आढळून येतात.
या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे
–प्रादुर्भावग्रस्त पाणी खालच्या बाजूला मुरगळतात. कडा पिवळसर होऊन तपकिरी होतात.
–अशी पाने वाळतात व गळून पडतात.
–जर लहानपणी रोपावस्थेत प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास झाडाची वाढ खुंटते.
–पाणी मुरगळून तपकिरी होतात.
–पाते, फुले व बोंडे लागल्यानंतर प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनामध्ये घट येते.
–प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास संपूर्ण झाड वाळू जाऊ शकते.
या किडीचा जीवनक्रम कसा असतो?
या किडीच्या प्रामुख्याने तीन अवस्था आहेत. अंडी, पिल्ले व प्रौढ अशा तीन अवस्था असतात. या किडीची मादी पानांच्या शिरेत अंडी घालते. चार ते अकरा दिवसांनी पिल्ले बाहेर पडतात. त्यांची पूर्ण वाढ 7 ते 21 दिवसात होते. पाच वेळा कात टाकून त्यांचे प्रौढात रूपांतर होते. एकूण जीवनक्रम दोन ते चार आठवड्यामध्ये पूर्ण होतो. वर्षभरामध्ये जवळपास अकरा पिढ्या पूर्ण होतात. कपाशीचे पिक जेव्हा 15 ते 20 दिवसांचे असते तेव्हापासून ते बोंडे फुटेपर्यंत. ऑगस्ट महिन्याचा दुसरा पंधरवडा आणि सप्टेंबर चा पहिला पंधरवडा या काळात या किडीची संख्या सर्वात जास्त असते. कपाशीचा हंगाम झाल्यावर इतर पर्यायी खाद्य वनस्पतींवर उपजीविका करतात.
या किडींचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे?
–कपाशीचा हंगाम संपल्यानंतर पिकाचे अवशेष जमा करून त्यांचा नायनाट करावा.
–लागवडीसाठी तुडतुड यास प्रतिकारक्षम वानांची निवड करणे फायदेशीर असते.
–कपाशी लागवड ही शिफारशीनुसार योग्य अंतरावर करावी.
–शिफारशीनुसार खतांच्या मात्रा द्याव्यात. नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर टाळावा.
–दर वर्षी पीक फेरपालट केले तर उत्तमच असते.
–कपाशीमध्ये चवळी,मुग, उडीद यासारखे कडधान्यचे आंतरपीक म्हणून लागवड करणे फायद्याचे असते.
–सुरुवातीच्या काळात रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करू नये. यामुळे मित्रकीटक उदा. ढालकिडा, क्रायसोपा, भक्षककोळी इत्यादीचे संवर्धन होते.
–इमिडाक्लोप्रीड किंवा थायमेथॉक्झाम यांची बीज प्रक्रिया केलेली असल्यास निऑनिकोटीनॉईड गटातील कीटकनाशकांची फवारणी करणे टाळावे.
जर एका पानावर दोन ते तीन तुडतुडे आणि पानाच्या कडा मुरडलेल्या, पिवळसर झालेली आढळल्यास खालील पैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी. या कीटकनाशकांचे प्रमाण प्रती लिटर पाणी आहे
–निंबोळी अर्क पाच टक्के किंवा ऍझाडीरॅक्टिन (1000 पी पी एम ) एक मिली किंवा (1500 पी पी एम )2.5मिली.
–फ्लोनिकामिड (50डब्ल्यू जी.)0.2 ग्रॅम
–डायमिथोएट (30 टक्के) एक मिली
–कपाशीच्या लागवडीपासून 60 दिवसांपर्यंत जैविक घटकांचा फवारणीसाठी वापर करावा.
–साठ दिवसानंतरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे फायद्याचे असते.
–एकाच रासायनिक कीटकनाशकांची लागोपाठ फवारणी करू नये वापर आलटून पालटून करावा.