हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांशी संगम झाल्यामुळे राज्यात वादळी वारे आणि पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातल्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आज आणि उद्या सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे. या पावसाची तीव्रता आणि व्याप्ती कमी असेल मात्र सोबतीला वादळी वारा आणि विजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान हवामान तज्ञ केस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी नवीन निरीक्षणे नोंदविण्यात आली असून नाशिक धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, आणि आजूबाजूच्या काही भागांवर ढग दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच आज सकाळी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक ,धुळे या भागात ढगाळ वातावरण झाले आहे.
राज्यातील कमाल तापमान
दरम्यान राज्यातील उन्हाची तीव्रता थोडीशी कमी झालेली आहे. यापूर्वी 37 अंशांपर्यंत काही शहरांचे तापमान गेलं होतं ते आता 34 आणि 35 अंशांच्या दरम्यान आले आहे. दिनांक सात रोजी राज्यातील एकाही शहरांचे कमाल तापमान पुढील प्रमाणे परभणी 34 .७ , मालेगाव 35.6, पुणे 34,अहमदनगर 37.4, सोलापूर 35.8, उस्मानाबाद 34.2, सांगली 35.2, आणि नाशिक 34 अंश सेल्सिअस. असे तापमान नोंदविण्यात आले आहे.
आज या भागात पाऊस
दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज सातारा, पुणे ,अहमदनगर, नाशिक ,औरंगाबाद, जळगाव, धुळे ,नंदुरबार, बीड ,जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली ,अमरावती, यवतमाळ, वर्धा ,नागपूर, चंद्रपूर, गोंदिया ,भंडारा, गडचिरोली ,कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पालघर ,ठाणे ,रायगड, मुंबई, रत्नागिरी आणि नांदेड या भागाला हलक्या पावसाची शक्यता आहे.