हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसाठी बियाणे खरेदी करताना (Bogus Seeds) अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक होते. पण फसवणूक झाल्यास न्यायालयीन लढा द्यायचा कसा? याचे उत्तम उदाहरण बीडच्या गेवराईतील एका शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. तीन-चार वर्षांपूर्वी एका तुरीच्या कंपनीचे बी शेतकऱ्यांनी पेरले. मात्र ते बियाणे वांज निघाले. यामध्ये शेतकऱ्यांना चांगलाच भुर्दंड बसला. याच्या विरोधात गेवराई येथील एका शेतकऱ्याने लढायचे (Bogus Seeds) ठरवले आणि आता या शेतकऱ्याने ही लढाई देखील जिंकली आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी (Bogus Seeds Beed Farmer)
बीड जिल्ह्यातील गेवराईतील शेतकऱ्यांनी 3 वर्षांपूर्वी तुरीची लागवड केली. तूर उगवली मात्र ती वांज निघाली. (Bogus Seeds) याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी करायला सुरुवात केली. मात्र त्यांना कुठेही काही भरपाई मिळेल, असे दिसले नाही. अनेक शेतकरी खचून गेले. मात्र एका शेतकऱ्याने आपल्याला नुकसान भरपाई मिळावी; यासाठी प्रयत्न सुरू केले. सुनील टकले असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
80 हजाराची मिळणार भरपाई
सुनीलने या तुरीच्या पिकाचे नुकसान झाले. त्यावेळी त्याने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारले. मात्र न्याय मिळाला नाही. त्यानंतर त्याने ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली. तीन वर्षानंतर या शेतकऱ्याला आता न्याय मिळाला आहे. झालेल्या नुकसानीच्या पैशासह इतर खर्चासह याला कंपनीने मदत करण्याची ऑर्डर कोर्टाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. एक एकर प्रति नुकसानाप्रमाणे 70 हजार रुपये व मानसिक त्रासापोटी 5 हजार रुपये आणि त्याचा झालेला खर्च 5 हजार असे एकूण 80 हजार रुपये देण्याचे कोर्टाने नमूद केले आहे.
शेतकऱ्यांनो… येथे नोंदवा तक्रार
खरीप हंगाम एका महिन्यावर येऊन ठेपला असून, यंदाही बोगस बियाण्यांचा सुळसुळाट होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिकिंगबाबत असलेल्या प्रत्येक तक्रारीचे निवारण कृषी विभागाकडून करण्यात येणार आहे. अतिरिक्त दराने खताची विक्री होत असल्यास बियाणे, खते खरेदीचे बिल मिळत नसल्यास शेतकऱ्यांनी आपल्या नावासह व संपूर्ण पत्ता, तक्रारीचे स्वरूप यांची माहिती कृषी विभागाकडे देऊन निवारण कक्षात तक्रार नोंदवावी. असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.