हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दर दोन आठवडयाला हवामान बदलत आहे. त्याचा सार्वधिक फटका हा पिकांना बसतोय . सध्या राज्यात एकीकडे थंडी वाढली असून दुसरीकडे ढगाळ हवामान होत आहे, पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यासह राज्यातल्या काही भागात असेच वातावरण कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अशा वातावरणाचा परिणाम खरिपातल्या तुरीवर , कापसावर तसेच नव्याने लागवड केलेल्या कांदा पिकावर होणार आहे. या तिनही पिकांच्या बाबतीत काय उपाययोजना करायच्या याची माहिती करून घेऊया…
१)कांदा पिकावरील उपाययोजना
–ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक परिणाम हा कांदा पीकावर होत आहे.
–पावसाळी कांदा लागवड करुन काही दिवसाचाच कालावधी लोटलेला आहे.
–मात्र, वातावरणातील बदलामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होताच मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 10 मिली या बुरशीनाशकांची फवारणी जांभळा, तपकिरी आणि काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे.
–शिवाय धुईचे प्रमाणही वाढत असल्याने कांद्याचे दुहेरी नुकसान होत आहे.
–त्यामुळे ही फवारणी त्वरीत करण्याचा सल्ला कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे.
२) तूरीवरील किडीचे व्यवस्थापन
–मारुका अळीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात 20 ते 25 ठिकाणी प्रति मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास किटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. शिवाय बुरशीचाही धोका वाढत आहे.
–फ्लूबेंडामाइड 20 डब्ल्यूजी 6 ग्रॅम किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू.पी 20 ग्रॅम किंवा नोवलुरोन 5.25 इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 16 मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
–ही फवारणी पॉवरस्प्रेने फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाची मात्रा ही तिप्पट करावी.
–गरज भासल्यास पुन्हा 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकांची अदलाबदल करावी.
–उपरोक्त किटकनाशकांसोबत इतर कीटकणशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये इत्यादी मिसळू नये.
३)कापसाला गुलाबी बोंडअळीचा धोका
–खरिपातील कापसाला यंदा विक्रमी दर मिळत आहे.
–त्यामुळे सोयाबीनचे झालेले नुकसान या पिकातून भरुन निघेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.
–मात्र, आता ढगाळ वातावरणामुळे अंतिम टप्प्यात गुलाबी बोंडअळीचा धोका वाढला आहे.
— मध्यंतरी अतिवृष्टीच्या दरम्यानही या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झालेला होता.
–तर आता कापूस वेचणी सुरु असताना निर्माण झालेले चित्र शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे आहे.
–त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकच्या उत्पादनासाठी वेचणी न डावलता वेळेत वेचणीचे काम केले तरच कापूस शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे.
–अन्यथा सोयाबीनप्रमाणेच कापसाचेही नुकसान होणार आहे.
— शिवाय ‘बीटी’ची फवारणी करुन पिकाचे या वातावरणापासून संरक्षण करणे गरजेचे झाले आहे.
संदर्भ : टीव्ही ९