सोयाबीन पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड ; VNMKV परभणी यांच्याकडून खास रोग संरक्षण संदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपूर्वी मराठवाड्याला अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला . आता पाऊस ओसरल्यानंतर मात्र सोयाबीन पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे रोग संरक्षण संदेश प्रसारित करण्यात आला आहे. हा संदेश VNMKV परभणी यांच्या मार्फ़त प्रसारित करण्यात आला आहे.

या संदेशात म्हंटले आहे की, “रोग संरक्षण संदेश सर्व सोयाबीन बीजोत्पादन घेणाऱ्या प्रभारी अधिकारी यांना सुचित करण्यात येते की , मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये व विशेषत : मराठवाडयामध्ये सर्वत्र पाऊस पडत आहे . तसेच सद्यस्थितीत वातावरण ढगाळ आहे . काही ठिकाणी सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगांचा विशेषतः करपा / शेंग करपा या रोगाचा प्रादुर्भाव पाने , फांद्या , देठ तसेच शेंगांवर देखील दिसून येत आहे .

कोणती फवारणी करावी

सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की , त्यांनी सोयाबीन पिकासाठी शिफारस केलेल्या टेब्युकोनाझोल २५.९ ईसी ( १२-१३ मिली / १० लीटर पाणी ) ( व्यापारी नाव – फोलीक्यूर ) किंवा टेब्युकोनाझोल १० % + सल्फर ६५ % डब्युजी ( २० ग्रॅम / १० लीटर पाणी ) ( व्यापारी नाव – स्वाधीन , विरू , हारु ) या बुरशीनाशकांची किंवा शिफारस नसलेल्या परंतू उपयुक्त असलेल्या कार्बेडाझीम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्युपी ( २५ ग्रॅम / १० लीटर पाणी ) ( व्यापारी नाव – साफ ) व मॅन्कोझेब ५० % + कार्बेन्डाझीम २५ % डब्ल्युएस ( २५ ग्रॅम / १० लीटर पाणी ) ( व्यापारी नाव – स्प्रीट ) या बुरशीनाशकांची तात्काळ फवारणी घ्यावी .

( विशेष सुचना : आपण अगोदर बुरशीनाशकाची फवारणी घेतली असेल ते बुरशीनाशक टाळून दुसरे बुरशीनाशक आत्ताच्या फवारणीसाठी वापरावे . )