पीक कर्जासाठी Cibil Score मागणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करा; फडणवीसांचे निर्देश

cibil score for crop loan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याकरिता सिबिल स्कोरची अट ठेवता येत नाही हा निर्णय स्टेट लेव्हल बँकिंग कमिटीमध्ये झाला आहे. त्यामुळे पीककर्जासाठी शेतकरी बांधवांना बँकांनी सिबिल स्कोर मागितल्यास सदर बँकांवर FIR दाखल करावा अशा स्पष्ट सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. अमरावती जिल्ह्याच्या खरीप हंगाम बैठकीनंतर बोलताना फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, काही बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी सिबिल स्कोर मागत आहेत, परंतु आज मी स्पष्ट आदेश देत आहे की, अशा बँकांवर गुन्हा दाखल करा. कारण शेतकरी बांधवांना पीक कर्ज त्वरित व सुलभ मिळण्यासाठी बँकांनी सिबिल स्कोअर चे निकष त्यांना लावू नये असे आरबीआयचे निर्देश आहेत. त्यामुळे असं असूनही जर बँका शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देणार असतील तर नाईलाजाने आम्हाला कारवाई करावी लागते.

याशिवाय अनेक बँकांनी विविध योजनांच्या अनुदानाचे पैसे कर्ज खात्यात टाकल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्याही संदर्भात आम्ही कडक निर्देश दिले आहेत. असे अनुदानाचे कोणतेही पैसे शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात टाकता येणार नाहीत हे आम्ही सांगितलेलं आहे असं फडणवीस म्हणाले. जलयुक्त शिवाराची कामे वेगाने व्हावीत असे आदेश सुद्धा दिल्याचे फडणवीसांनी सांगितलं. अवकाळीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी पहिल्या टप्प्याचा निधी वितरित होत आहे. उर्वरित दोन टप्प्यातील निधी येत्या काही दिवसात वर्ग केला जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.