हॅलो कृषी ऑनलाईन : रविवारी रात्रभर उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावाला ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या महिन्यातभरात अधून – मधून पाऊस दमदार बरसला आहे. यामुळे कांदा, सोयाबीन, उडीद, मका, तुर पिकांना सुरुवातीस पोषक वाटणारा पाऊस आता मात्र,खरीप पिकांचा कर्दनकाळ ठरला आहे. यामुळे शेतकऱ्यांत मोठे चिंतेचे वातावरण आहे.
कांदा, उडीद, सोयाबीन, मुग ,मका ,भाजीपाला पाण्यातच सडून जात आहे. यामुळे खरीप पिकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील रानमसले, वडाळा, नान्नज, पडसाळी, कळमण, गावडी दारफळ , वांगी , शेजारील खुनेश्वर , मोरवंची यापरिसरात अशीच अवस्था झाली आहे. सध्या रानमसले परिसरात शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून ओढे, नाले ,विहीरी तुडुंब भरुन वाहत आहेत.
नागरिकांच्या घरात पाणी
कौठाळी- कळमण रोडावरील पुलावर पाणी आल्याने कौठाळी गावचा संपर्क तुटला आहे. तसेच रानमसले – खुनेश्वर , रानमसले -पडसाळी, रानमसले – वांगी रस्त्यावर वांगिरा आणि डोहिरा ओढा दुथडी भरुन वाहत असल्याने वाहतुक ठप्प झाली आहे. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. धान्य, संसारोपयोगी साहित्य भिजले आहे. याबाबत महसुल विभागाकडून घरांचे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सीना-भोगावती नद्यांना पूर आल्याने मलिकपेठ येथील जुना बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. गेल्या 4 ऑगस्ट रोजी सीना नदीला पूर आल्याने येथील बंधारा पाण्याखाली गेला होता. सोलापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून जिल्ह्यातील अनेक भागातील ओढे-नाले ओसंडून वाहत आहेत. सीना आणि भोगावती नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून यामध्ये उडीद, सोयाबीन, मका व इतर पिकांचे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. नद्यांच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने नदी काठी असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या पाणी उपसण्याच्या मोटारी पाण्याखाली जावून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नसताना या नद्यांना दुसर्यांदा पूर आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. प्रशासनाने पुराच्या पाण्यामुळे झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.