हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, सध्याचे वातावरण पाहता राज्यातल्या काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. एकूणच राज्यातील वातावरण पाहता उष्णता काही अंशी वाढल्याचं दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण,मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भामध्ये पुढचे पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये देखील उष्णतेमध्ये वाढ होत आहे. काल दिनांक 27 एप्रिल रोजी राज्यातील सर्वाधिक तापमान हे ब्रह्मपुरी इथं नोंदवण्यात आले असून हे तापमान 45.1 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे.
‘या’ भागात यलो अलर्ट
28एप्रिल– हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 28 एप्रिल रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
29एप्रिल – दिनांक 29 एप्रिल रोजी अकोला, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर या भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर दिनांक 29 रोजी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही.
30 एप्रिल – दिनांक 30 एप्रिल रोजी देखील राज्यात पावसाचा कोणताही यलो अलर्ट दिलेला नाहीये. तर वर्धा यवतमाळ नागपूर आणि चंद्रपूर या भागाला हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटे साठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.