हॅलो कृषी ऑनलाईन : डिंक्या हा रोग मोसंबी, संत्रा व कागदी लिंबावर येणारा प्रमूख बुरशीजन्य रोग असून त्यामूळे ब-याचशा बागांचा 10 ते 12 वर्षामध्ये -हास होतो. हा रोग फायटोप्थोरा या बुरशीमूळे होत असून या रोगाची बुरशी जमिनीमध्ये वर्षानुवर्ष सुप्त अवस्थेत वास्तव्य करुन राहत असते. या रोगाचा प्रादुर्भाव, प्रसार व वाढ होण्यासाठी जमिनीतील जास्तीचा ओलावा, दमट व उष्ण हवामान कारणीभूत ठरते. रोगग्रस्त खोड व फांदयावर चिकट द्रवाचे स्त्रवण होत असते. म्हणून या रोगाला डिंक्या रोग असे म्हणतात. रोपवाटिकेत या रोगाचा प्रादूर्भाव झाल्यास रोपाची मुळे कुजतात त्यामूळे झाडाची वाढ खुंटूण पाने पिवळी पडून गळतात. रोगग्रस्त झाडावरील फांदया शेंडयाकडून खाली वाळतात. व कालांतराने रोगाची तिव्रता वाढल्यास संपूर्ण झाड वाळते. रोगाच्या वाढीमुळे जमिनीलगतचे खोड, सोटमूळ व तंतूमय मूळे कुजतात. त्यामूळे अन्न व पाणी शोषण करण्याची प्रक्रीया मंदावते.
व्यवस्थापन :
• बागेची लागवड करण्यासाठी रंगपूर लाईन या रोगप्रतीकारक खुंटाचा वापर करावा.
• चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या, चिकन माती, दलदलीची जमिन इ. मध्ये फळ पिकाची लागवड करु नये.
• बागेला शक्यतो ठिबक सिंचनाने पाणी दयावे व अतिरीक्त पाण्याचा निचरा करण्याची सोय करावी.
• डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येताच मेटॅलॅक्झीकल 2.5 ग्रॅम किंवा फोसाटाईल-ए एल 2.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात द्रावण तयार करुन फवारणी करावी.
• पावसाळयामध्ये गरजेनूसार या बुरशीनाशकांच्या आलटून पालटून 12 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.
• प्रतीवर्षी पावसाळयापुर्वी व पावसाळयानंतर 2 वेळा बोर्डोपेस्ट 1 टक्का (1 किलो मोरचुद+1किलो कळीचा चुना +10 लि. पाणी) तयार करुन सर्व झाडाच्या खोडावर जमिनीपासून 3 ते 4 फुट उंची पर्यंत लावावेत. बोर्डोपेस्ट लावण्यापुर्वी रोगग्रस्त फांदया, खोडावरील तडकलेली साल व डिंक इ. काढून खोड स्वच्छ करावे.
• पावसाळयामध्ये 1 टक्का बोर्डोमिश्रणाची (1 किलो मोरचुद+1किलो कळीचा चुना +100 लि. पाणी) 2 ते 3 वेळा फवारणी करावी. काही कारणास्तव झाडाची साल फाटली असल्यास १ टक्का पोटॅशिअम परमॅग्नेट १० ग्राम प्रति लिटर पाण्याने पुसून घ्यावी. त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी.
संदर्भ – बळीराजा मासिक