हॅलो कृषी ऑनलाईन : कोकणामध्ये विविध प्रकारची फळझाडे आढळतात. आंबा, काजू, नारळ, सुपारी झाडांच्या (Kokum Farming) कोकणात मोठ्या प्रमाणात बागा आहेत. त्यामध्ये कोकम हे प्रामुख्याने आढळणारे सदाहरित फळझाड आहे. या फळपिकाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड कशी करायची. याबाबत आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. कोकम लागवडीसाठी (Kokum Farming) पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन उपयुक्त आहे. या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी उष्ण व दमट हवामान योग्य असते.
‘या’ आहेत सुधारित जाती (Kokum Farming In Maharashtra)
कोकमामध्ये रोपापासून लागवड (Kokum Farming) केल्यास ५० टक्के नर व ५० टक्के मादी झाडे निघतात. खात्रीशीर मादी झाडे मिळविण्यासाठी कलम पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठाने मृदकाष्ठ पद्धत विकसित केली आहे. लागवडीत ९० टक्के मादी व १० टक्के नरांची झाडे ठेवावीत. कोकण अमृता व कोकण हातीस या विद्यापीठाने सुधारित जाती विकसित केल्या आहेत. यात कोकण अमृता या जातीची फळे मध्यम आकाराची, जाड सालीची आणि आकर्षक लाल रंगाची असून, उत्पन्न भरपूर (१४० किलो/झाड) देणारी आहेत. पावसाळ्यापूर्वी उत्पन्न मिळत असल्यामुळे फळांचे नुकसान होत नाही.
तर कोकण हातीस ही विद्यापीठाने २००६ मध्ये विकसित केलेली मादी जात आहे. या जातीची फळे मोठी, जाड सालीची व गर्द लाल रंगाची आहेत. प्रति झाडापासून १० व्या वर्षी १५० किलो फळे मिळतात. हे मादी झाड असल्यामुळे परागीकरण व फलधारणेसाठी कोकणाचे ‘नर’ कलम किंवा ५ ते ६ टक्के रोपे बागेत लावणे गरजेचे आहे.
कशी करावी लागवड?
कोकम लागवडीसाठी मे महिन्यात सहा बाय सहा मीटर अंतरावर ६० बाय ६० बाय ६० सेंटिमीटर आकाराचे खड्डे काढावेत. पावसाळ्यापूर्वी चांगली माती, एक घमेले कुजलेले शेणखत व १.० किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. रोपांचे किंवा कलमांचे वाळवीपासून संरक्षण करण्यासाठी ५० ग्रॅम फॉलीडॉल पावडर प्रत्येक खड्यात टाकावे. पावसाच्या सुरुवातीला प्रत्येक खड्यात एक वर्षाची निरोगी, जोमदार वाढणारी दोन रोपे किंवा एक कलम लावावे. रोपांपासून लागवड केलेल्या बागांना ६ वर्षांनी मोहर येऊन मादी झाडापासून उत्पन्न मिळू लागते.
कधी कराल काढणी?
रोपांची लागवड केलेल्या झाडाला सहा वर्षांनंतर फळे धरू लागतात. तर कलमांपासून पाचव्या वर्षांपासून फळे घ्यावीत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत फुले येण्यास सुरुवात होते. मार्च ते जून महिन्यांपर्यंत फळे काढणीसाठी तयार होतात. हिरव्या रंगाची कच्ची फळे पिकल्यानंतर लाल होतात. पूर्ण लाल झाल्यानंतर फळे काढावीत. चांगल्या वाढलेल्या व योग्य वीण राखलेल्या झाडांपासून प्रत्येक वर्षी १०० ते १५० किलोपर्यंत फळे मिळतात.