हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकरी शेतीमध्ये (Natural Farming) पूर्ण क्षमतेने झोकून देऊन काम करताना दिसून येत आहे. यात काही शेतकरी हे शेतीत नवनवीन प्रयोग करत, शेतीमध्ये नाविन्यता आणत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांची ही कार्यक्षमता बघून सरकारकडून देखील वेळोवेळी विविध पुरस्कारांच्या माध्यमातून सन्मान करण्यात येत असल्याचे पाहायला मिळते. आज आपण शेतीमध्ये कल्पकता आणत पद्मश्री पुरस्काराला गवसणी घालणाऱ्या प्रगतिशील शेतकरी संजय अनंत पाटील यांच्या यांच्याबाबत (Natural Farming) जाणून घेणार आहोत.
‘वन मॅन आर्मी’ म्हणून ओळख (Sanjay Patil Natural Farming)
31 ऑगस्ट 1964 रोजी गोव्यातील कुलाघर येथे जन्मलेले संजय पाटील हे कल्पक शेतकरी आणि हरित क्रांतीचे पुरस्कर्ते आहेत. स्थानिक परिसरात संजय काका म्हणून प्रसिद्ध असल्याने त्यांना अनेक जण त्यांना ‘वन मॅन आर्मी’ म्हणूनही ओळखतात. कारण त्यांनी एकट्याने दहा एकर ओसाड जमिनीवर नैसर्गिक शेती (Natural Farming) तसेच शून्य उर्जा वापरासह सूक्ष्म सिंचन पद्धतीचा संपूर्ण स्वीकार करून एकहाती हिरवेगार कुळागार (झाडांची लागवड आणि पशुधन यांच्यावर आधारित एकात्मिक कृषी पद्धती) उभे केली आहे.
5000 लिटर जीवामृताचे उत्पादन
शेतकरी संजय पाटील यांनी 1991 पासून जीवामृताच्या वापरासह नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली. एकाच देशी वाणातील गाईचे शेण आणि गोमुत्र यांचा उपयोग करून, ते दर महिन्याला 5000 लिटर जीवामृताचे उत्पादन करतात. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा एक ग्रामदेखील न वापरता केवळ एक देशी गाय, दहा एकर शेतीसाठी पुरेशी आहे हे त्यांनी स्वतःच्या पद्धतीतून दाखवून दिले आहे.
स्वयंचलित संयंत्रांची उभारणी
जीवामृताचा उत्पादनाचा वेग वाढवून उत्पादन सुधारण्यासाठी त्यांनी स्वयंचलित जीवामृत उत्पादन संयंत्रांची उभारणी केली आहे. नैसर्गिक शेती प्रक्रियेचा स्वीकार केल्यानंतर त्यांचा उत्पादन खर्च 60 ते 70 टक्क्यांनी कमी झाला तसेच त्यांच्या पिकाचे उत्पादन 25 ते 30 टक्क्यांनी वाढले आणि 3 लाखांची बचतही झाली असल्याचे ते सांगतात.
अनेक पुरस्कारांनी आहे सन्मानित
संजय पाटील आदर्श शेतकरी असून त्यांचे शेत आवर्जून बघण्यासारखे आहे. दरवर्षी 300 ते 500 लोक त्यांच्या शेताला भेट देऊन तेथील नाविन्यपूर्ण यंत्रणा पाहतात. पाटील यांच्या या शेतीतील या यशाने त्यांच्या सोबतच्या अनेक शेतकऱ्यांना खास करून तरुणांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी प्रेरणा देत आहे. पाटील यांना गोवा राज्य सरकारकडून कृषिरत्न-2014 हा पुरस्कार मिळाला असून त्यांना आयएआरआय-कल्पक शेतकरी-2023 या पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.